

Geological Heartbeat Slowly Spilt Africa : पृथ्वीच्या भूगर्भात सातत्याने बदल होत आहेत. मानवासाठी हे बदल लाखो-करोडो वर्षांत होत असले तरी, निसर्गासाठी त्याचा वेग कमालीचा वाढला असल्याचे एका नवीन संशोधनात समोर आले आहे. शास्त्रज्ञांना पूर्व आफ्रिकेच्या भूगर्भातील प्रक्रियेवर प्रकाशझोत टाकला आहे. नेचर जिओसायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या नव्या संशोधनानुसार, इथिओपियाच्या अफार प्रदेशाखालील पृथ्वीच्या गाभ्यातून वितळलेल्या खडकांचे स्फोट होत असून त्याचे वर्णन 'भूगर्भीय हार्टबीट' असे करण्यात आले आहे. उष्णता आणि ज्वालामुखीतून बाहेर येणारा लाव्हा यांचे हे स्फोट हळूहळू भूकवच कमकुवत करत आहेत. यामुळे भूकंप, ज्वालामुखींचा उद्रेक आणि जमिनी सतत फाटणे आदी प्रक्रिया सुरू आहेत. पुढील पाच ते दहा दशलक्ष वर्षांत आफ्रिका दोन भागांत विभागला जाऊन एक नव्या महासागराला जन्म देईल, असे शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
शास्त्रज्ञांच्या संशोधनातून असे समोर आले आहे की, इथिओपियातील अफार डिप्रेशन हे पृथ्वीवरील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे लाल समुद्र दरी, अदनचा आखात दरीप्रदेश आणि मुख्य इथिओपियन दरी या तीन भूगर्भीय भेगा एकत्र येतात. त्यांना 'ट्रिपल जंक्शन' म्हणूनही ओळखले जाते. येथे वारंवार होणारे भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेक यामुळे हा प्रदेश चर्चेत असतोच. आता शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, या हालचालींमागील कारण म्हणजे येथील जमिनीखालील वितळलेल्या खडकांचा स्तंभ अखंड प्रवाहात न येता लहरी स्वरूपात वर येते.
संशोधकांनी १३० हून अधिक तरुण ज्वालामुखींमधून गोळा केलेल्या लाव्हाच्या नमुन्यांचे विश्लेषण केले. याचे रासायनिक रचना वेगळी असल्याचे आढळले. यामध्ये सापडलेल्या रासायनिक नमुने दर्शवतात की, इथिओपियातील अफारच्या खालील मॅंटल एकसमान वाहत नाही. ते हृदयाच्या ठोक्यांप्रमाणे लयबद्ध स्पंदन (पल्स) करत आहे. हेच स्पंदन पातळ होत असलेल्या पृष्ठभागाशी संलग्न होऊन दरी निर्माण होण्याची गती वाढवत आहे आणि नव्या महासागराच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगवान करत आहे.
इथिओपियाच्या अफार प्रदेशाखालील मंद पण सातत्याने चालणारी हालचाल भूगर्भात दऱ्या निर्माण होत आहेत. लाखो वर्षांनंतर लाल समुद्र आणि अदनच्या आखातातील पाणी या दरीत शिरून एक विशाल नवा महासागर निर्माण होईल. त्या वेळी युगांडा, रवांडा आणि काँगो यांसारख्या आज भूभागात अडकलेल्या देशांना समुद्रकिनाऱ्याची थेट सुविधा मिळेल, असाही अंदाज भूगर्भशास्त्रज्ञांना व्यक्त केला आहे.
या संशोधनामुळे पृथ्वीच्या गर्भातील मॅन्टल प्रवाह आणि टेक्टॉनिक प्लेट यांच्या परस्परसंवादाविषयीची आपली समज अधिक व्यापक झाली आहे. याच प्रक्रियेमुळे पूर्वी दक्षिण अमेरिका आफ्रिकापासून अलग होऊन अटलांटिक महासागराची निर्मिती झाली होती. शास्त्रज्ञांच्या मते, अशा मॅन्टल प्लूम्समधून कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइडसारखी वायू मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित होतात, ज्यामुळे पृथ्वीचे हवामान बदलू शकते आणि इतिहासातल्या सामूहिक प्रलयांसारख्या घटना घडू शकतात, असा इशाराही भूगर्भशास्त्रज्ञांनी दिला आहे.
संशोधकांनी स्पष्ट केले ओ की, आफ्रिकेचे विभाजन एका रात्रीत होणार नाही, परंतु लाखो वर्षांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. आता भविष्यातील भूगर्भ अभ्यासाचा उद्देश पातळ प्लेट्सखालील मॅंटलच्या प्रवाहाचा अधिक तपशीलवार नकाशा तयार करणार आहे. यामुळे ज्वालामुखींच्या उद्रेक आणि भूकंप कुठे होऊ शकतात याबद्दलची भविष्यवाणी सुधारण्यास मदत होईल.