मनिला(फिलीपिन्स) : पुढारी ऑनलाईन
दक्षिण फिलीपिन्स शनिवारी (ता.२९) सकाळी जबरदस्त भूकंपाच्या धक्याने हादरले. अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण विभागाने (यूएसजीएस) दिलेल्या माहितीनुसार ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का होता. फिलीपिन्समध्ये झालेल्या या भूकंपामुळे शेजारील देश असलेल्या इंडोनेशियामध्येही त्सुनामीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यूएसजीएस विभागाच्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू दवावो शहराच्या दक्षिण पूर्व भागामध्ये ५९ किलोमीटर खाली होता. प्रशांत महासागर त्सुनामी इशारा केंद्राच्या म्हणण्यानुसार या भूकंपामुळे इंडोनेशिया आणि फिलीपिन्सच्या किनारी भागात त्सुनामीची शक्यता आहे.
दरम्यान या भूकंपामध्ये अजूनही जीवीत तसेच वित्तहानी झाल्याचे समोर आलेले नाही. तसेच त्सुनामीचाही इशारा देण्यात आलेला नाही. या तीव्र भूकंपाचे धक्के पाच मिनीटे जाणवले. भूकंपाची तीव्रता ज्यादा असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि लोकांनी रस्त्यावर येण्यास सुरवात केली. फिलीपिन्सचा शेजारी असलेल्या इंडोनेशियामध्ये मागील आठवड्यात झालेल्या विनाशकारी त्सुनामीमध्ये ४०० लोकांचा बळी गेला होता.