लॉस एंजेलिस : पुढारी ऑनलाईन
अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियाला शक्तीशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.१ एवढी होती, अशी माहिती अमेरिकेच्या भूगर्भ सर्व्हेक्षण विभागाने दिली आहे.
याआधी ४ जुलै रोजी येथे ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर काल रात्री पुन्हा कॅलिफोर्नियाचा दक्षिण भाग भूकंपाने हादरला. या भूकंपाचा हादरा हा याआधी झालेल्या भूकंपाच्या तुलनेत ११ पटीने अधिक होता. यामुळे नागरिक भयभीत झाले.
या भूकंपाचा केंद्रबिंदू कॅलिफोर्नियातील रिजक्रेस्ट पासून ११ माईल्स अंतरावर होता. या भूकंपाच्या धक्क्याने अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून जमिनीवर कोसळल्या.
कॅलिफोर्नियात १९९९ मध्ये ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यानंतरचा आता दुसरा सर्वात शक्तिशाली भूंकप झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कॅलिफोर्नियातील स्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे.