

Gaurav Jaisingh Dies
अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाला आहे. बहामासमध्ये प्री-ग्रॅज्युएशन ट्रिप दरम्यान ही घटना घडली. गौरव जयसिंह असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या पदवीदान समारंभाची तयारी करत होता. त्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रॉयल बहामास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉल्थम येथील बेंटले विद्यापीठात पदवी शिक्षण घेत असलेल्या गौरव जयसिंह या विद्यार्थ्याचा पॅराडाईज आयलंडवरील एका हॉटेलच्या वरच्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. गौरवचे काही दिवसांत पदवी शिक्षण पूर्ण होणार होते. पण त्यापूर्वीच त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, एका व्यक्ती त्याच्या रूममेट्ससोबत खोलीत असताना बाल्कनीतून खाली पडला. या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजता मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. तो खालच्या मजल्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला रुग्णालयात नेले जात असताना त्याचा मृत्यू झाला.
गौरव हा एका फायनान्स मेजर आणि डेल्टा सिग्मा पीआय गटाचा सदस्य होता. तो विद्यापीठाच्या वार्षिक ट्रिपसाठी गेला असताना ही दुर्घटना घडली. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलवरील माहितीनुसार, तो बेंटलेच्या साउथ एशियन स्टुडंट्स असोसिएशनमध्येही सक्रिय होता.
बेंटले विद्यापीठाने जारी केलेल्या एका निवेदनात या घटनेची पुष्टी केली. ही दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. "आम्ही गौरवच्या कुटुंबीयाप्रति मनापासून संवेदना व्यक्त करतो. स्थानिक अधिकारी या प्रकरणी चौकशी करत आहेत. गौरव चुकून बाल्कनीतून पडला असे दिसते. त्याच्या कुटुंबीयांच्या गोपनीयतेचा आदर करून आम्ही अधिक माहिती मिळाल्यानंतर ती शेअर करु", असे निवेदनात नमूद केले आहे.
फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, रॉयल बहामास पोलिस या घटनेचा सातत्याने तपास करत आहे. या घटनेमुळे जे विद्यार्थी प्रभावित झाले आहेत त्यांना विद्यापीठाने त्यांच्या समुपदेशन केंद्राची मदत घेण्याचे आवाहन केले आहे.