इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून ‘ऑपरेशन सिंदूर ’ अंतर्गत हल्ला केल्यानंतर पाकच्या अण्वस्त्र साठ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळेच पाकिस्तानने अमेरिकेच्या मध्यस्थीने भारतापुढे गुडघे टेकल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले. दरम्यान, पाकिस्तानमध्ये हालचालीही वाढलेल्या दिसत आहेत. पाकमधील मुर्री जिल्ह्यातील एका विमानतळावर इजिप्शियन एअर फोर्सचे ट्रान्स्पोर्ट विमान उतरल्याचे वृत्त समोर आले आहे. हे विमान अण्वस्त्रांमधून निघणारा किरणोत्सर्ग रोखण्यासाठी लागणारे ‘बोरॉन’ घेऊन आल्याचे सांगण्यात येत आहे.
फ्लाईट रडार 24 हे विमान उड्डाणाची स्थिती सांगणारे अॅप आहे. या अॅपवरील माहितीनुसार, ईजीवाय 1916 या कॉलसाईनच्या इजिप्शियन विमानने 11 मे रोजी दुपारी भुर्बन (बीएचसी) विमानतळावरून उड्डाण केल्याचे स्पष्ट झाले. हे विमान चीनमधून पाकिस्तानात आले. पाकिस्तानमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘बोरॉन’ आणि इजिप्शियन विमानाच्या पाकिस्तान भेटीचा संबंध जोडला जात आहे. दरम्यान, भारत व पाकिस्तानकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, इजिप्शियन विमान अचानक पाकमध्ये उतरल्याने पाकच्या अण्वस्त्रांना लक्ष्य केल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.
‘बोरॉन’ हा धातूसद़ृश घटक इजिप्तच्या नाईल डेल्टा भागात आढळतो. अणुऊर्जा संयंत्रांमध्ये किरणोत्सर्ग रोखण्यासाठी ‘बोरॉन’ वापरला जातो. युरेनियमच्या विघटनातून निर्माण होणारे थर्मल न्यूट्रॉन्स ‘बोरॉन’ शोषून घेतो, त्यामुळे तो न्यूट्रॉन शोषक म्हणून काम करतो. चर्नोबिल अणू दुर्घटनेनंतर रिअॅक्टरमध्ये वाळू, माती, शिसे आणि बोरॉन टाकून किरणोत्सर्ग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.