

Flydubai pilot arrest terror plot : 'फ्लायदुबई' एअरलाईनशी संबंधित दहशतवादी हल्ल्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणात एक नवीन आणि धक्कादायक बाब समोर आली आहे. दुबई पोलिसांनी आणखी दोन वैमानिकांना अटक केली आहे. हे दोन्ही वैमानिक मालदीवचे नागरिक असून 'फ्लायदुबई'मध्ये कार्यरत आहेत. दुबईमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचा संशय त्यांच्यावर आहे. या दोघांनीही यापूर्वी इस्रायलला भेट दिल्याची धक्कादायक माहितीही पोलीस तपासात समोर आली आहे.
मालदीवमधील 'अधाधू' (Adhadhu) या वृत्तसंस्थेनुसार, यूएईमधील मालदीवच्या दूतावासाने त्यांच्या कुटुंबीयांना या अटकेबाबत माहिती दिली आहे. 'फ्लायदुबई'मध्ये काम करणाऱ्या सहा मालदीवियन वैमानिकांपैकी हे दोन वैमानिक सर्वात अलीकडे नियुक्त झालेले आहेत. रिपोर्टनुसार, त्यांनी ओमानचे सह-वैमानिक (को-पायलट) हमाम अल-हम्मामी यांच्यासोबत काम केले होते. ३० सप्टेंबर रोजी विमान कोसळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अल-हम्मामी यांच्यावर आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही किंवा या दोन वैमानिकांविरुद्ध सार्वजनिकरीत्या कोणतेही आरोप दाखल करण्यात आलेले नाहीत.
या घटनेनंतर आसफ नावाच्या एका प्रवाशाने आपले म्हणणे मांडले. त्याच्या मते, क्रू मेंबर्सनी (विमान कर्मचाऱ्यांनी) आरोपीवरील पकड ढिली करण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांना व्हिडिओ किंवा फोटो काढण्यापासून रोखले. तसेच, जखमी भारतीय कॅप्टनच्या तोंडात एक विचित्र गोळी घालण्याचा प्रयत्नही कर्मचाऱ्यांनी केल्याचे त्याने सांगितले. आसफने नमूद केले की, विमानात केवळ पुरुष फ्लाइट अटेंडंट्स उपस्थित होते; त्यामुळे आरोपीने काही कर्मचाऱ्यांना आधीच तयार ठेवले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वृत्तानुसार, इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर विमान कोसळवण्याचा आरोपीचा इरादा होता. आणखी दोन वैमानिकांच्या अटकेमुळे आता या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढली आहे. हा कट केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नव्हता, असा संशय अधिकाऱ्यांना आहे. 'फ्लायदुबई' किंवा यूएईच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेही मोठे निवेदन आलेले नाही; या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.
३० सप्टेंबर रोजी दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवच्या दिशेने 'फ्लायदुबई'च्या FZ1073 या विमानाने उड्डाण केले. उड्डाणादरम्यान, ओमानचे सह-वैमानिक (को-पायलट) हमाम अल-हम्मामी यांनी भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला. यानंतर विमानाचे नियंत्रण स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. कॅप्टन मच्छार यांनी हल्लेखोराचा जोरदार प्रतिकार केला. परिस्थिती हाताळत असताना त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला; त्यानंतर, एका इस्रायली प्रवाशाने कॉकपिटमध्ये प्रवेश केला आणि विमान सुरक्षित ठेवण्यास मदत केली. विमानाचा मार्ग त्वरित बदलण्यात आला. ते सौदी अरेबियातील तबुक येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले. यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप विमानतळावरून उतरवण्यात आले होते. भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्यवान कामगिरीमुळे मोठा दहशतवादी कट उधळला गेला.