

Donald Trump White House advisory board Ex Jihadist Ismail Royer lashkar e taiba
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इस्लामिक जिहादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या दोन व्यक्तींना व्हाईट हाऊसच्या ‘Advisory Board of Lay Leaders’ या सल्लागार मंडळावर नियुक्त केल्याचे समोर आले आहे. अमेरिकन शोध पत्रकार लॉरा लूमर यांच्या वृत्तानंतर जगभरात खळबळ उडाली आहे.
वृत्तानुसार, व्हाईट हाऊसच्या ले लीडर्सच्या सल्लागार मंडळावर दोन माजी जिहादींची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्याची घोषणा व्हाईट हाऊसच्या अधिकृत वेबसाइटवर करण्यात आली आहे. इस्माइल रॉयर आणि जायतुना कॉलेजचा सह-संस्थापक शेख हमजा युसूफ हे दोघेही इस्लामिक जिहादींशी संबंधीत असूनही त्यांना सल्लागार मंडळावर घेण्यात आले आहे.
इस्माईल रॉयर याने 2000 साली पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याने इतर जिहादींना अशा शिबिरांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत केली आणि काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा ठिकाणांवर हल्ले करण्यासारख्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याचेही लॉरा लूमर यांच्या वृत्तात म्हटले आहे.
या नियुक्त्यांमुळे अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे ट्रम्प प्रशासनाच्या नियुक्ती प्रक्रियेवर आणि सुरक्षा तपासणीच्या निकषांवर टीका केली जात आहे. तसेच लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांमुळे मोठ्या प्रमाणावर दहशतवादाचा सामना करावा लागलेल्या भारतासारख्या देशासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. या नियुक्त्यांमुळे भारत-अमेरिका संबंधांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2004 मध्ये, दहशतवादी कारवायांमध्ये दोषी आढळल्यानंतर अमेरिकन न्यायालयाने इस्माईल रॉयरला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तो 'व्हर्जिनिया जिहादी नेटवर्क'शी संबंधित होता. एफबीआयच्या तपासानुसार, त्याने पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी छावणीत दहशतवाद्यांना पाठवण्यात आणि त्यांना तेथे शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात मदत केली होती. 2023 मध्ये मिडल ईस्ट फोरमला दिलेल्या मुलाखतीत, रॉयरने त्याच्या जिहादी भूतकाळाची आठवण करून दिली आणि म्हटले, ‘मला लष्कर-ए-तैयबामधील लोक आवडले. मला सांगण्यात आले की ही दहशतवादी संघटना नाही.’ असा उल्लेखही वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
लारा लूमर यांनी आणखी एक नियुक्त सदस्य शेख हमजा युसूफ यांच्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत. लूमर यांनी असा दावा केला की, ‘युसूफ हा मुस्लिम ब्रदरहूड आणि हमास सारख्या संघटनांशी संबंधित आहे. त्याच्या झायतुना कॉलेजमध्ये शरिया कायदा शिकवला जातो आणि ही संस्था इस्लामिक कट्टरतावादाला प्रोत्साहन देते.’ या संपूर्ण वादावर व्हाईट हाऊसकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
लूमर यांनी एक्स वर पोस्ट केले की, ‘व्हाईट हाऊसमध्ये दहशतवादी सल्लागार म्हणून असणे ही लाजिरवाणी बाब असून अमेरिकेच्या सुरक्षा आणि लोकशाही मूल्यांची थट्टा आहे.’ ट्रम्प प्रशासनातील माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ यांच्या बडतर्फीचा संबंधही लूमर यांनी या प्रकरणाशी जोडला असून ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत वर्तुळात कट्टरपंथी विचारसरणीचे लोक स्थान मिळवत असल्याचे संकेत दिले.
भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी लष्कर-ए-तैयबा जबाबदार आहे. यात 2008 च्या मुंबई हल्ल्याचा समावेश आहे, ज्यामध्ये 166 लोक मारले गेले होते. अलिकडेच, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या लपण्याच्या ठिकाणांवर अचूक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये, मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचे मरकझ येथील प्रशिक्षण केंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.