Starlink India : "प्रिय पंतप्रधान अंबानी...": 'स्टारलिंक' वादात मस्क यांचा पुन्‍हा एकदा मुकेश अंबानींवर थेट निशाणा

दोन दिवसांमध्ये सलग दुसऱ्यांदा अंबानींवर उपहासात्मक टीका

Elon Musk vs Mukesh Ambani Starlink India
Pudhari
Published on: 
Updated on: 

Elon Musk vs Mukesh Ambani Starlink India : "प्रिय पंतप्रधान अंबानी, तुम्हीच भारताचे खरे बॉस आहात हे माझ्या लक्षात न आल्याबद्दल कृपया माझी नम्र माफी स्वीकारावी," अशा शब्दांमध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती आणि टेस्ला, स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांनी पुन्हा एकदा भारतातील अग्रणी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर निशाणा साधला आहे.

रिलायन्स आणि स्टारलिंक कंपनी आमने-सामने

भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवण्यावरून मुकेश अंबानी यांची रिलायन्स आणि मस्क यांची स्टारलिंक कंपनी आमने-सामने आल्या आहेत. या संघर्षात आपली भूमिका अधिक आक्रमक करत, तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधीश एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा आपल्या 'X' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून टीकास्त्र सोडले आहे.

"तुम्ही स्टारलिंकला स्पर्धा करण्याची संधी देण्याचा विचार कराल का?"

आपल्या एक्स पोस्टमध्ये मस्क यांनी म्हटले आहे की, "स्वाभाविकच, भारतातील महान जनतेचे मक्तेदारीद्वारे शोषण करणे तुम्हाला पसंत पडेल; तरीही, तुम्ही स्टारलिंकला स्पर्धा करण्याची संधी देण्याचा विचार कराल का? इतर सर्व देशांप्रमाणेच भारतातही असे अनेक भाग आहेत जिथे इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे मुलांना शिक्षणाची संधी मिळत नाही आणि लघुउद्योजकांना जागतिक बाजारपेठेत आपला माल विकता येत नाही. स्टारलिंकमुळे त्यांचे जीवन नक्कीच अधिक चांगले होईल."

वादाची सुरुवात नेमकी केव्हा झाली?

७ ऑक्टोबर रोजी 'एक्स' (X) वरील एका युजरला उत्तर देताना मस्क यांनी म्हटले होते की, "दुर्दैवाने, भारतीय जनतेवर आपली मक्तेदारी कायम राखण्यासाठी काही अब्जाधीश उद्योगपती आम्हाला रोखत आहेत. ते कोण आहेत याचा तुम्ही अंदाज लावू शकता... हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आहे!".


Elon Musk vs Mukesh Ambani Starlink India
Starlink India: स्टारलिंकला भारतात परवानगी का नाही? मस्क यांनी थेट अंबानींच नाव घेत विचारला प्रश्न; वादात राहुल गांधींची एन्ट्री

दूरसंचार मंत्रालयाने मस्क यांचा दावा फेटाळला

गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दूरसंचार मंत्रालयाने मस्क यांचा दावा निराधार असल्याचे म्हटले. "सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवांसाठीच्या भारताच्या नियामक आराखड्याच्या निष्पक्षतेबाबत आणि त्याची अंमलबजावणी भेदभावपूर्ण पद्धतीने केली जात असल्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे. सरकारने सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवा सह सर्व दूरसंचार सेवांसाठी एक निष्पक्ष आणि भेदभाव-रहित परवाना (ऑथोरायझेशन) आराखडा लागू केला आहे," असे मंत्रालयाने म्हटले होते.

अंबानी हेच भारताचे खरे मालक आहेत का?

गुरुवारी मस्क यांनी पुन्हा 'एक्स'वर प्रश्न उपस्थित केला की स्टारलिंकला परवाना का मिळाला नाही; त्यांनी दावा केला की कंपनीने भारत सरकारच्या "प्रत्येक कायद्याचे" पालन केले आहे. "स्टारलिंककडे १६५ हून अधिक देशांचे परवाने आहेत आणि भारत सरकारच्या प्रत्येक कायद्याचे व अटींचे पालन करण्यात आम्ही पाच वर्षे घालवली आहेत, तरीही परवाना का नाही? अंबानी हेच भारताचे खरे मालक आहेत का?" असा सवालही त्यांनी केला होता. यानंतर शुक्रवार ९ ऑक्टोबर रोजीच्या पोस्टमध्ये, नैसर्गिक आपत्तींच्या वेळी अन्य दळणवळण यंत्रणा निकामी ठरतात तेव्हा जीव वाचवण्यासाठी स्टारलिंक अत्यंत उपयुक्त ठरली आहे. या कंपनीला भारतात काम करण्याची परवानगी दिल्यास, देशभरातील पुरुष, स्त्रिया आणि मुलांचे प्राण वाचवण्यासही मदत होईल, असा दावाही त्यांनी केला होता.


Elon Musk vs Mukesh Ambani Starlink India
Starlink in India | मोबाईल टॉवर्स होणार इतिहास जमा..! एलन मस्‍क यांची 'स्टारलिंक' भारतात सुरु करणार 'डायरेक्ट-टू-सेल' सेवा

केंद्र सरकारकडून कंपन्यांच्या सुरक्षेची तपासणी

एलॉन मस्कच्या 'स्पेसएक्स' कंपनीची 'स्टारलिंक' ही सॅटेलाइटवरून इंटरनेट सेवा देणारी कंपनी आहे. या क्षेत्रात भारतात मुख्यत्वे स्टारलिंक, युटेलसॅट वनवेब (भारती समूहाचा पाठिंबा असलेली) आणि जिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन्स (अंबानींच्या जिओची कंपनी) कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांना केंद्र सरकारने भारतात काम करण्यासाठी दूरसंचार परवाने दिले आहेत. प्रत्यक्षात इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी आणि इंटरनेटची फ्रिक्वेन्सी मिळवण्यासाठी या कंपन्यांना सुरक्षेचे सर्व नियम पाळावे लागतील हे सिद्ध करावे लागेल. सध्या केंद्र सरकारकडून या कंपन्यांच्या सुरक्षेची कसून तपासणी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news