नवी दिल्ली : टॅरिफवरून भारत आणि अमेरिकेदरम्यानचा तणाव अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या त्यांच्या संबंधांबद्दल एक मोठे विधान केले आहे.
“भारत आणि अमेरिका यांचे संबंध खूप खास आहेत. सध्या तणाव असला तरी मी आणि मोदी कायम मित्र राहू. ते एक उत्तम पंतप्रधान आहेत, ते महान आहेत. पण ते सध्या जे करत आहेत, ते मला आवडत नाही. तरीही भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध खूप विशेष आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही, कारण अशा काही गोष्टी दोन्ही देशांमध्ये होत असतात.”
ट्रम्प यांना विचारले होते की, “ते भारतासोबतचे संबंध पुन्हा सुधारण्यास तयार आहेत का?” कारण टॅरिफमुळे दोन्ही देशांचे संबंध गेल्या दोन दशकांत सर्वात वाईट टप्प्यातून जात आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, “भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्यामुळे त्यांना खूप निराशा झाली आहे. आम्ही भारतावर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत माझे संबंध चांगले आहेत, ते महान आहेत. काही महिन्यांपूर्वी ते इथे आले होते.” भारत आणि इतर देशांसोबतची व्यापार चर्चा कशी सुरू आहे, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले की, “ती चांगली सुरू आहे. युरोपियन युनियनमुळे आम्ही खूप निराश आहोत.” याआधी ट्रम्प म्हणाले होते की, “आम्ही भारत आणि रशियाला चीनच्या हातात गमावले आहे असे आम्हाला वाटते.” यासोबतच ट्रम्प यांनी मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा एक फोटोही पोस्ट केला होता.
यापूर्वी ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार पीटर नॅवारो यांनीही भारतावर निशाणा साधत म्हटले होते की, “भारत रशियाकडून तेल खरेदी करून खूप नफा कमावत आहे. भारत सत्य पचवू शकत नाही. मला वाटतं की, भारताने युक्रेनच्या विरोधात रशियाच्या युद्धाला सातत्याने मदत केल्यामुळे ट्रेड टीम आणि राष्ट्राध्यक्ष निराश आहेत.”