

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमेरिकेत आयात शुल्क (टॅरिफ) मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. याबाबत त्यांच्याविरोधात अमेरिकेच्या फेडरल सर्किट कोर्ट ऑफ अपीलमध्ये खटला सुरू आहे. न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल विरोधात गेल्यास अमेरिकेला १९२९ सारख्या महामंदीसारख्या आर्थिक संकटाला समोरे जावे लागेल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (दि.८) सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला. यामुळे अमेरिकेचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर म्हणाले की, आमेरिकेला या आयात शुल्काचा (टॅरिफ) फायदा होत असून शेअर बाजाराने उंची गाठली आहे. यामुळे अब्जावधी डॉलर्सची अमेरिकेच्या तिजोरीत भर पडत आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळून सरकारला आयकरऐवजी उत्पन्नाचा दुसरा स्रोत मिळेल.
पुढे ट्रम्प म्हणाले की, डाव्या विचारसरणीच्या न्यायालयाने आमच्याविरुद्ध निकाल दिला तर आपण देशाची समृद्धी व अब्जावधी डॉलर्सची होणारी कमाई गमावून बसू, यामुळे आपल्याला मोठ्या आर्थिक संकटाला आपल्याला सामोरे जावे लागेल. हा निर्णय अमेरिकेच्या संपत्ती, शक्ती आणि जागतिक प्रभावाविरुद्ध असेल. याचे गंभीर परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतील, असेही ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केले. हे संपूर्ण प्रकरण 'इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ॲक्ट' (IEEPA) या कायद्यांतर्गत न्यायालयात सुरू आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा आर्थिक बडगा उगारला आहे. ट्रम्प यांनी भारताने रशियन तेलाची खरेदी केल्याचे कारण पुढे करत भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली. आधी २५% कर होता, त्यामध्ये आणखी २५ टक्के वाढ होऊन ५० टक्के करण्यात आला आहे. यामुळे भारत- अमेरिका व्यापारी संबंधात दुरावा येण्याची शक्यता आहे.