Donald Trump | 'डोनाल्ड ट्रम्प' ठरले पित्याकडून मुलीच्या हत्येचे निमित्त! ब्रिटनमधील न्यायालयात धक्कादायक खुलासे!
Donald Trump controversy news
वॉशिंग्टन/लंडन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विषयावरून झालेल्या वादानंतर, एका २३ वर्षीय ब्रिटिश तरुणीची तिच्याच वडिलांनी अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सुनावणी सध्या ब्रिटनमधील चेशायर कोरोनर कोर्टात सुरू असून, त्यादरम्यान या घटनेचे हृदयद्रावक तपशील उघड झाले आहेत.
ट्रम्प यांच्यावरुन झाला होता वाद
मूळची चेशायरमधील वॉरिंग्टन येथील रहिवासी असलेली लुसी हॅरिसन ही 'फॅशन बायर' म्हणून कार्यरत होती. १० जानेवारी २०२५ रोजी ती टेक्सासमध्ये स्थायिक झालेल्या तिचे वडील क्रिस हॅरिसन यांना भेटण्यासाठी अमेरिकेत गेली होती. लुसीचा जोडीदार लिटलर याने न्यायालयात दिलेल्या साक्षीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी वडील आणि मुलीमध्ये डोनल्ड ट्रम्प यांच्यावरून मोठा वाद झाला होता.
मुलीच्या प्रश्नावर बापाने दिले अत्यंत असंवेदनशील उत्तर
वादाचे कारण न्यायालयात सांगण्यात आले की, ट्रम्प यांच्याशी संबंधित एका वादादरम्यान लुसीने वडिलांना विचारणा केली की, "माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले असते, तर तुम्हाला कसे वाटले असते?" यावर क्रिस म्हणाले,. "माझ्यासोबत इतर दोन मुली राहतात, त्यामुळे मला त्याचे फारसे काही वाटणार नाही." या उत्तरामुळे लुसी कमालीची अस्वस्थ झाली होती.
विमानतळावर निघण्यापूर्वीच झाडली गोळी
दुपारी लुसी आणि लिटलर विमानतळावर जाण्यासाठी निघणार होते. त्यापूर्वी अर्धा तास आधी क्रिस यांनी लुसीचा हात धरून तिला खालच्या मजल्यावरील बेडरूममध्ये नेले. त्यानंतर अवघ्या १५ सेकंदात गोळी झाडल्याचा मोठा आवाज आला. लिटलरने धावत जाऊन पाहिले असता लुसी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तिचे वडील किंचाळत होते.
चुकून गोळी सुटल्याचा वडिलांचा दावा
वडिलांचा बचाव आणि कबुली क्रिस हॅरिसन यांनी न्यायालयात पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते मुलीला आपली 'ग्लॉक ९ एमएम' पिस्तूल दाखवत होते आणि त्याच वेळी चुकून गोळी सुटली. "माझे बोट ट्रिगरवर होते की नाही, हे मला आठवत नाही," असे त्यांनी सांगितले. तसेच, घटनेच्या दिवशी आपण मद्यपान केले होते, अशी कबुलीही त्यांनी दिली. क्रिस यांनी यापूर्वी मद्यपानाच्या सवयीमुळे व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले होते.पुढील सुनावणी लुसीच्या वडिलांनी आपल्या कृत्याचा पश्चात्ताप व्यक्त केला असून, "या दुःखाचे ओझे मी आयुष्यभर वाहीन," असे म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, आता कोरोनर न्यायालय निकाल देणार आहे.

