

Delta flight engine fire
लॉस एंजेलिस : डेल्टा एअरलाइन्सच्या लॉस एंजेलिस (LAX) येथून अटलांटा कडे जाणाऱ्या फ्लाइट क्रमांक DL446 मध्ये शुक्रवारी (19 जुलै) एक धक्कादायक प्रकार घडला. टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनला आग लागली.
त्यामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. तथापि, घाबरलेल्या प्रवाशांना वैमानिकाने आश्वस्त केले. वैमानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. यात विमान हवेत झपाट्याने वर जात असतानाच विमानाच्या डाव्या बाजूला जळणाऱ्या इंजिनाचे दृश्य स्पष्ट दिसते. काही मिनिटांतच वैमानिकांनी प्रसंगावधान राखत विमान परत वळवले आणि लॉस एंजेलिस विमानतळावर सुरक्षित उतरवले.
डेल्टा एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने बीबीसीशी बोलताना सांगितले की, “डेल्टा फ्लाईट 446 ला डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाडाची सूचना मिळाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने परत आणण्यात आले.” कंपनीच्या माहितीनुसार, या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही.
Aviation A2Z या हवाई उड्डाणविषयक संकेतस्थळानुसार, विमानाने LAX वरून टेकऑफ केल्यानंतर पॅसिफिक महासागराकडे मार्गक्रमण केले होते. मात्र इंजिनमध्ये समस्या लक्षात आल्यानंतर ते डॉनी आणि पॅरामाउंट भागांवरून वळवण्यात आले. एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ने तात्काळ विमानाला मार्गदर्शन केले व तळावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या.
ही घटना डेल्टा एअरलाईन्ससाठी यावर्षीची दुसरी मोठी इंजिन आगीची घटना ठरली आहे. एप्रिल महिन्यात फ्लाइट क्रमांक DL1213 (ऑरलॅंडो ते अटलांटा) या विमानात टेकऑफपूर्वी रनवेवरच इंजिनला आग लागली होती.
त्या वेळी Airbus A330 प्रकारचं विमान होतं व 282 प्रवासी व 12 कर्मचारी विमानात होते. सर्व प्रवाशांना वेळेवर बाहेर काढण्यात आले होते व कुठलीही जीवितहानी झाली नव्हती.