

China Brahmaputra Dam Tibet Mega Dam Yarlung Tsangpo World’s Largest Hydropower Project
नवी दिल्ली : चीनने तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवर (यारलुंग त्सांगपो) 167 अब्ज डॉलर्स (सुमारे 1.2 ट्रिलियन युआन) खर्च करून जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम अधिकृतपणे सुरू केले आहे. तिबेटमधील न्यिंगची शहराजवळील मैलिंग (Mainling) भागात या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
या प्रकल्पाचे उद्घाटन चिनचे पंतप्रधान ली क्यांग यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हे धरण चीनच्या "थ्री गॉर्जेस डॅम" पेक्षाही मोठे असेल. थ्री गॉर्जेस डॅमची 22500 मेगावॅट क्षमतेच्या तुलनेत, नवीन धरण 60000 मेगावॅट वीज निर्मिती करणार असून, हे जगातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प ठरेल.
या महाकाय प्रकल्पांतर्गत ब्रह्मपुत्रेच्या खालच्या प्रवाहावर पाच ‘कॅसकेड’ जलविद्युत केंद्रे उभारली जाणार आहेत. वर्षभरात सुमारे 300 अब्ज युनिट वीज निर्माण केली जाणार असून, यामुळे सुमारे 30 कोटी लोकांची वार्षिक वीज गरज पूर्ण होऊ शकते.
भारत आणि बांगलादेश या प्रकल्पाबाबत चिंतेत आहेत. भारतासाठी हा मुद्दा विशेष संवेदनशील आहे कारण ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशातून पुढे आसाम आणि बांगलादेशात प्रवेश करते.
भारताला भीती आहे की चीन या धरणाचा वापर युद्धाच्या काळात पाणी रोखून ठेवणे किंवा अचानक सोडून पूर आणण्याकरिता करू शकतो. दरम्यान, भारताने देखील अरुणाचल प्रदेशात ब्रह्मपुत्रेवर एक मोठा जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे.
हा प्रकल्प हिमालयाच्या ज्या भागात उभारला जात आहे, तो भूगर्भीय दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आहे. ही जागा दोन टेक्टॉनिक प्लेट्सच्या संयोगावर असून, अनेक वेळा भूकंप येतात.
चिनी अधिकाऱ्यांनी मात्र सांगितले की प्रकल्पासाठी भूगर्भीय संशोधन व अत्याधुनिक अभियांत्रिकी उपाययोजना करण्यात आल्या आहेत आणि पर्यावरणीय सुरक्षेलाही प्राधान्य दिले गेले आहे.
भारत आणि चीन यांच्यात एक्स्पर्ट लेव्हल मेकॅनिझम (ELM) अंतर्गत 2006 पासून ट्रान्सबॉर्डर नद्यांबाबत चर्चा सुरू आहे. दरवर्षी पुराच्या हंगामात चीन भारताला ब्रह्मपुत्रा व सतलज नद्यांचे जलविज्ञानविषयक डेटा पुरवतो.
2024 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली होती.
चीनचा हा जलविद्युत प्रकल्प अभियांत्रिकी, पर्यावरण, भू-राजकीय धोरणे आणि सामरिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. तिबेटमधील हा भाग म्हणजेच ब्रह्मपुत्रेचा उगम, भारताच्या पाण्यावरच्या हक्कासाठी अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे.
त्यामुळे या प्रकल्पाचे परिणाम केवळ चीनपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण दक्षिण आशियावर पडणार आहेत.