

बँकॉकजवळील नॉनथाबुरी प्रांतात शुक्रवारपासून या तीन दिवसीय डेथ फेस्टला सुरुवात झाली आहे. या महोत्सवात केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर मृत्यूच्या वेळच्या कायदेशीर आणि व्यावहारिक सेवांबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.
Death Fest Thailand
नॉनथाबुरी : एकीकडे मध्य-पूर्व आशिया युद्धात होरपळत आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील संघर्षाने आतापर्यंत शेकडो नागरिकांचे बळी घेतले आहेत. अशातच थायलंड देशात आयोजित जगावेगळा 'डेथ फेस्ट' (Death Fest) चर्चेचा विषय ठरला आहे. आगळ्यावेगळ्या मेळाव्याचे हे दुसरे वर्ष असून, अनेकांसाठी अस्वस्थ करणाऱ्या मृत्यू विषयावर येथे मोकळेपणाने संवाद साधला जात आहे.
'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, मृत्यूची भीती न बाळगता त्याचा स्वीकार करताना, मृत्यू संबंधित व्यावहारिक व आध्यात्मिक मार्गदर्शन करणे हा 'डेथ फेस्ट'चा महोत्सवाचा मूळ उद्देश आहे. आगळ्यावेगळ्या मेळाव्याचे हे दुसरे वर्ष असून, अनेकांसाठी अस्वस्थ करणाऱ्या या विषयावर येथे मोकळेपणाने संवाद साधला जात आहे.
थायलंडच्या संस्कृतीवर बौद्ध धम्माचा मोठा प्रभाव आहे आणि 'जन्म, आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू' हे जीवनाचे अटळ सत्य आहे, हीच या महोत्सवाची मूळ संकल्पना आहे.
बँकॉकजवळील नॉनथाबुरी प्रांतात शुक्रवारपासून या तीन दिवसीय महोत्सवाला सुरुवात झाली. आपल्या आईसोबत महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेल्या गामविनीजरूने सांगितले की, "पूर्वी आमच्या कुटुंबात मृत्यूवर बोलणे खूप कठीण होते. मात्र, गेल्या २० वर्षांत मी पतीसह कर्करोगाने ग्रस्त असलेल्या नातेवाईकांची सुश्रूषा केली आहे. जवळच्या व्यक्तींचे मृत्यू जवळून पाहिल्यामुळे आता मी या विषयावर अधिक मोकळेपणाने बोलू शकते."
'एपी'ने दिलेल्या वृत्तानुसार, या महोत्सवात केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर मृत्यूच्या वेळच्या कायदेशीर आणि व्यावहारिक सेवांबाबतही मार्गदर्शन केले जात आहे. या महोत्सवाचे नाव जरी भीतीदायक असेल तरी येथे कोणतेही भडक प्रदर्शन नाही. येथे कोणताही देखावा नाही; त्याऐवजी हे दालन माहितीचे स्टॉल्स, गटचर्चा आणि वृद्धत्वातील काळजी व अंत्यविधीच्या नियोजनावर मार्गदर्शन दिले जात आहे.
या महोत्सवाची रचना अत्यंत व्यावहारिक आहे. रुग्णालये आणि सामाजिक संस्थांसोबतच 'अॅडव्हान्स केअर प्लॅनिंग', अवयवदान, 'हॉस्पिस' पर्याय आणि अंत्यविधीच्या व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करणारे सेवा पुरवठादार येथे एकत्र आहेत. यामागची संकल्पना साधी पण महत्त्वाची आहे. 'डेथ फेस्ट' ही सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतो, जेणेकरून लोक संकट येण्यापूर्वीच त्याचा विचार करू शकतील, असा आयोजकांचा दावा आहे.
येथे येणाऱ्या गर्दीत सर्व वयोगटातील लोक आहेत. मध्यमवयीन प्रामुख्याने केअर नेटवर्क्स आणि नियोजनाबद्दल तपशीलवार प्रश्न विचारताना दिसतात, तर तरुण पिढी एका शांत कुतूहलाने या संकल्पना समजून घेत आहे. ते कदाचित लगेच निर्णय घेणार नाहीत, परंतु जे विषय दैनंदिन संवादात कधीच येत नाहीत, त्याबद्दलची माहिती ते आत्मसात करत आहेत.
आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकही येथे वेगळ्या भूमिकेत आहेत. महोत्सवाला भेट देणार्यांशी ते मोकळेपणाने संवाद साधत आहेत. संकटकाळात घाईने पर्याय सुचवण्याऐवजी, ते येथे शांतपणे प्रश्नांची उत्तरे देत आहेत. यामुळे वातावरणात भीतीऐवजी पूर्वतयारीचा आणि दूरदृष्टीचा सूर दिसत आहे.कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये काळजी घेणाऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि आजारपणात कोणाला आधार देण्याचे भावनिक वास्तव यावरही भाष्य केले जात आहे. अगदी पर्यावरणास पूरक शवपेट्यांचे डिझाइन किंवा अंत्यसंस्काराचे वेगळे पर्याय, हे सर्व केवळ एक माहिती म्हणून मांडले आहेत. हे सुचवते की, आयुष्याच्या शेवटचे नियोजन हे व्यक्तीच्या प्राधान्यांनुसार; मग ते पर्यावरणीय असो, सांस्कृतिक असो वा आध्यात्मिक असू शकते.
'डेथ फेस्ट'ला केवळ शैक्षणिक म्हणणे पुरेसे ठरणार नाही, तर त्याला थायलंडमधील बदलती सामाजिक परिस्थितीही कारणीभूत आहे. अनेक थाई घरांमध्ये मृत्यूविषयीची चर्चा संकट येईपर्यंत पुढे ढकलली जाते. हे प्रदर्शन अशा विषयांवरील सामाजिक संकोच दूर करण्याचे काम करत आहे. थायलंडची लोकसंख्या जशी वृद्धत्वाकडे झुकत आहे, तसे सन्मान, जबाबदारी आणि काळजी घेण्याबाबतचे प्रश्न वारंवार समोर येणार आहेत. 'डेथ फेस्ट' हे प्रश्न पूर्णपणे सोडवत नसला तरी, ते विचारण्यासाठी एक व्यासपीठ नक्कीच मिळवून देत असल्याचा दावा आयोजक करत आहेत.