

Congo Ebola outbreak
जिनेव्हा: कांगो आणि युगांडा या आफ्रिकन देशांमध्ये इबोला विषाणूने पुन्हा एकदा गंभीर रूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेने आज या वाढत्या प्रादुर्भावाला 'आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केले आहे. दरम्यान, हा संसर्ग 'बंडिबुग्यो' विषाणूमुळे पसरत असून, सध्यातरी याला जागतिक महामारी घोषित करण्याचे निकष लागू होत नसल्याचे 'डब्ल्यूएचओ'ने स्पष्ट केले आहे.
शनिवारपर्यंत कांगोच्या इटुरी प्रांतातील बुनिया, रवामपारा आणि मोंगब्वालू या तीन प्रमुख आरोग्य क्षेत्रांमध्ये अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात आतापर्यंत ८० संशयित रुग्णांचा मृत्यू झाला असून, प्रयोगशाळेत ८ जणांना इबोलाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय, २४६ संशयित रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रभावित भागात 'व्हायरल हेमोरेजिक फिव्हर'च्या लक्षणांमुळे ४ आरोग्य कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे.
या विषाणूचा प्रसार शेजारील देशांमध्येही होऊ लागला आहे. कांगोमधून प्रवास करून युगांडाच्या कंपाला येथे पोहोचलेल्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींना इबोलाची लागण झाल्याचे १५ आणि १६ मे २०२६ रोजी स्पष्ट झाले. प्रयोगशाळेच्या तपासणीत या दोन्ही रुग्णांना 'बंडिबुग्यो' विषाणूची लागण झाल्याचे सिद्ध झाले असून, विशेष म्हणजे या दोन्ही रुग्णांचा परस्परांशी थेट कोणताही संबंध आलेला नव्हता. यामुळे युगांडातही भीतीचे वातावरण आहे.
इबोला हा अत्यंत धोकादायक विषाणूमुळे होणारा आजार आहे. हा संसर्ग तसा दुर्मिळ असला तरी तो कमालीचा तीव्र आणि बहुतांश प्रकरणांमध्ये जीवघेणा ठरतो.
प्रसाराची कारणे:
हा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील द्रव्यांच्या (उदा. रक्त, उलट्या, घाम किंवा वीर्य) थेट संपर्कात आल्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरतो.
उपचार आणि लस:
इबोलावर अद्याप कोणताही निश्चित किंवा खात्रीशीर उपचार उपलब्ध नाही. मात्र, या संसर्गाला रोखण्यासाठी प्रभावी लस उपलब्ध आहे, जी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरली जात आहे.