

Pervez Musharraf
वॉशिंग्टन : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी अमेरिकेला पाकिस्तानी अण्वस्त्रांचे नियंत्रण दिले होते, तसेच अब्जावधी डॉलर्सच्या मदतीच्या बदल्यात मुशर्रफ यांना अमेरिकेने 'विकत घेतले' होते, असा खळबळजनक खुलासा अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए (CIA) चे माजी अधिकारी जॉन किरियाकू यांनी केला आहे. २००२ मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध करतील असे आम्हाला वाटले होते. मुशर्रफ भारताच्या विरोधात दहशतवादी गटांना प्रोत्साहन देत असतानाही अमेरिकेला सहकार्याचा दिखावा करत होते, असेही किरियाकू यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने मुशर्रफ यांना 'विकत घेतले'
सीआयएमध्ये १५ वर्षे काम केलेले आणि पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी कारवायांची जबाबदारी सांभाळलेले जॉन किरियाकू यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना हे गौप्यस्फोट केले. ते म्हणाले, "अमेरिकेला हुकूमशहांसोबत काम करणे सोपे जाते, कारण तिथे जनता किंवा माध्यमांचा दबाव नसतो. आम्ही मुशर्रफ यांना 'विकत घेतले' होते आणि ते आम्हाला पाकिस्तानमध्ये आमच्या मर्जीनुसार काम करू देत होते."
किरियाकू यांच्या माहितीनुसार, एक काळ असा होता जेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर नियंत्रण ठेवत होता. याचा अर्थ मुशर्रफ यांनी अमेरिकेला अण्वस्त्रांच्या नियंत्रणाची चावी सोपवली होती.
भारताविरुद्ध दुहेरी खेळ
किरियाकू यांनी दावा केला की, मुशर्रफ दुहेरी भूमिका वठवत होते. ते अमेरिकेकडून दहशतवादविरोधी लढ्यात सहकार्य करण्याचा दिखावा करत होते, परंतु त्याचवेळी पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवादी गट भारताच्या विरोधात कार्यरत ठेवले होते. "पाकिस्तानी सैन्याची खरी चिंता अल-कायदा नव्हती, तर भारत होता. मुशर्रफ वरवर अमेरिकेसोबत होते, पण पडद्याआड ते भारताविरुद्ध काम करत होते," असे किरियाकू यांनी स्पष्ट केले.
सौदी अरेबियामुळे ए.क्यू. खान बचावले
अण्वस्त्रांचे रहस्य उघड करणारे पाकिस्तानी वैज्ञानिक अब्दुल कादिर खान यांच्यावर अमेरिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु सौदी अरेबियाच्या हस्तक्षेपामुळे तो थांबवावा लागला, अशी माहितीही किरियाकू यांनी दिली. "जर आम्ही इस्रायलसारखा विचार केला असता, तर ए.क्यू. खान यांना संपवून टाकले असते. पण सौदी अरेबियाने त्यांना 'सोडून द्या, आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत' असे सांगितले," असे किरियाकू म्हणाले.
अमेरिका आणि सौदी अरेबियामधील संबंध पूर्णपणे 'तेल आणि शस्त्रे' यावर आधारित असल्याचेही त्यांनी नमूद केले. "आम्ही त्यांचे तेल खरेदी करतो आणि ते आमची शस्त्रे. हेच आहे खरे नाते."
जागतिक सत्ता संतुलन बदलतेय
किरियाकू यांनी शेवटी सांगितले की, आता जगाचे सत्ता संतुलन झपाट्याने बदलत आहे. "आता अमेरिकेकडे स्वतःचे तेल उत्पादन आहे, त्यामुळे सौदी अरेबियाची गरज कमी झाली आहे. परिणामी सौदी अरेबिया आता चीन आणि भारतासोबत आपले संबंध अधिक मजबूत करत आहे. संपूर्ण जगाची दिशा बदलत आहे," असे त्यांनी सांगितले.