

बर्लिन/(पीटीआय): भारत घाईगडबडीत किंवा डोक्यावर बंदूक ठेवून व्यापार करार करत नाही, अशी रोखठोख भूमिका वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मांडली.
जर्मन दौर्यावेळी एका कार्यक्रमात ते म्हणाले की, उच्च दरांचा सामना करण्यासाठी भारत नवीन बाजारपेठांचा शोध घेत आहे. भारताला अटींसह दीर्घकालीन आणि न्याय्य व्यापार करार मिळत आहे का, असे विचारले असता गोयल म्हणाले, ‘मला वाटत नाही की भारताने राष्ट्रीय हिताशिवाय इतर कोणत्याही विचारांवर आधारित आपले मित्र कोण असतील हे कधी ठरवले आहे... आणि जर कोणी मला सांगितले की तुम्ही युरोपियन युनियनशी मैत्री करू शकत नाही, तर मी ते स्वीकारणार नाही किंवा उद्या कोणी मला सांगितले की मी केनियासोबत काम करू शकत नाही, तर ते स्वीकारार्ह नाही.’ एखाद्या देशाकडून विशिष्ट उत्पादन खरेदी करण्याचा निर्णय संपूर्ण जगाला घ्यावा लागेल, असे ते म्हणाले. अमेरिकेने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवावे यासाठी भारतावर दबाव आणत असल्याच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
गोयल म्हणाले की, भारत युरोपियन युनियन आणि अमेरिकेसह अनेक देश आणि प्रदेशांसोबत व्यापार करारांवर सक्रियपणे वाटाघाटी करत आहे. ‘आम्ही युरोपियन युनियनसोबत सक्रिय चर्चेत आहोत. आम्ही अमेरिकेशी बोलत आहोत, पण आम्ही घाईगडबडीत सौदे करत नाही आणि आम्ही अंतिम मुदतीसह किंवा डोक्यावर बंदूक ठेवून सौदे करत नाही,’ असे ते जर्मनीतील बर्लिन डायलॉगमध्ये म्हणाले.