

Operation Sindoor CDS General Anil Chauhan
भारताने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान सोशल मीडियावर अनेक खोट्या बातम्या पसरल्या. याबाबत आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी खुलासा केला आहे. 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान, चुकीच्या आणि खोट्या बातम्यांना उत्तर देण्यातच सुमारे १५ टक्के वेळ द्यावा लागला, असे चौहान यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, यावरून स्पष्ट होते की, भारताला माहिती युद्धासाठी एक स्वतंत्र आणि विशेष शाखेची गरज आहे.
सिंगापूरमधील 'शांगरी-ला डायलॉग'मध्ये बोलताना अनिल चौहान यांनी सांगितले की, जरी उत्तर देण्यास थोडा विलंब झाला तरी भारताची रणनीती तथ्य आधारित संवादावर राहिली. सुरुवातीला, दोन महिला अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधत 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माहिती दिली. कारण त्यावेळी वरिष्ठ लष्करी अधिकारी ऑपरेशनमध्ये व्यस्त राहिले होते.
जनरल चौहान म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने चीनच्या कमर्शियल सॅटेलाईट इमेजरीचा वापर केला, असे मानले जाते. पण त्यांना रिअल-टाइम टार्गेटिंगसाठी त्यांना मदत मिळाल्याचे आतापर्यंत कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. तर भारताने या 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान 'आकाश क्षेपणास्त्र प्रणाली' सारख्या स्वदेशी प्रणालींचा वापर केला आणि त्यात भारताला मोठे यश मिळाले.
भारताने आपल्या स्वदेशी आणि परदेशी रडार प्रणाली एकत्रित करून एक मजबूत आणि एकात्मिक संरक्षण पायाभूत संरचना उभारली, ज्यामुळे युद्धादरम्यान योग्य वेळी आणि योग्य निर्णय घेता आले. ते म्हणाले की, हा एक 'नॉन-कॉन्टॅक्ट, मल्टी-डोमेन' संघर्ष होता; ज्यात जमीन, हवाई, सायबर आणि अन्य क्षेत्रांचा वापर करण्यात आला. यात मारक (kinetic) आणि गैर-मारक (kinetic) अशा दोन्ही शस्त्रांचा वापर करण्यात आला. हे भविष्यातील युद्धाचे एक उदाहरण आहे.
आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर, लढाईविना दीर्घकाळ सैन्य तैनात करणे जास्त खर्चिक पडते. दीर्घकाळ चालणारे युद्ध देशाच्या विकासात अडथळा आणते. शत्रूलाही हे माहित आहे की, विकास थांबल्याचा अथवा नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
नुकसानीबाबत बोलताना जनरल चौहान म्हणाले की, कोणतेही युद्ध नुकसानाविना नसते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण कसे प्रत्युत्तर देतो?. ते म्हणाले, यावेळी भारताने तीन दिवसांच्या आतच जोरदार आणि चोख प्रत्युत्तर दिले आणि त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळू दिली नाही.