

ChatGPT
नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओपन एआय लवकरच त्यांच्या लोकप्रिय चॅटबॉट ChatGPT मध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. आता ChatGPT वापरकर्त्यांना 'वयाच्या पडताळणी'नंतर अनेक संवेदनशील आणि 'एडल्ट' विषयांवर मोकळेपणाने चर्चा करण्याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. कंपनी डिसेंबर महिन्यात हे नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे.
एका अहवालानुसार, OpenAI डिसेंबरमध्ये ChatGPT मध्ये 'Age Verification' सुविधा समाविष्ट करण्याची योजना आखत आहे. या नवीन सुविधेमुळे वापरकर्ते चॅटजीपीटीसोबत अशा अनेक विषयांवर संवाद साधू शकतील, ज्यावर सध्या निर्बंध आहेत. कंपनीने ऑगस्ट महिन्यात काही 'एडल्ट' कंटेंटवर कठोर निर्बंध लागू केले होते. या निर्बंधांमुळे प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांनी घालवलेल्या वेळेत काहीशी घट झाल्याचे निदर्शनास आले. याच पार्श्वभूमीवर, आपला यूजर बेस टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कंपनीने आता पडताळणी केलेल्या प्रौढ वापरकर्त्यांसाठी काही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर्वी OpenAI ने किशोरवयीन मुलांसाठी पालक नियंत्रणाची सुविधा दिली होती आणि आत्महत्या किंवा एडल्ट विषयांसारख्या संवेदनशील चर्चांवर निर्बंध घातले होते. आता वयाची पडताळणी पर्यायाने कंपनी वापरकर्त्यांना अनेक विषयांवर चर्चा करण्याची सुविधा देऊ इच्छिते. यापूर्वी अनेक बातम्या आल्या होत्या की, काही प्रौढ वापरकर्ते निर्बंध लागू होण्यापूर्वी AI चॅटबॉटसोबत रोमँटिक गप्पा मारत होते.
सध्या, वयाची पडताळणी कशी केली जाईल याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की, हे फिचर डिसेंबरमध्ये येईल. मात्र, त्यांनी हे स्पष्ट केले नाही की हा पर्याय ऐच्छिक असेल की आपोआप लागू होईल. YouTube आणि Google सारख्या इतर प्लॅटफॉर्मवरही अशीच फीचर्स दिसली आहेत, जी काही सुविधांना परवानगी देण्यापूर्वी वयाची पडताळणी करतात.