Canada School Shooting: कॅनडामधील शाळेत भीषण गोळीबार! संशयितासह किमान 10 जणांचा मृत्यू, 25 हून अधिक जखमी
Canada School Shooting British Columbia: कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया भागात सकाळी गोळीबाराची घटना घडली. ईशान्य भागातील टम्बलर रिज येथील टम्बलर रिज शाळेत झालेल्या या हल्ल्यात गोळीबार करणाऱ्यासह किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 25 पेक्षा जास्त लोक जखमी झाले असून, त्यातील दोन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.
रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या (RCMP) माहितीनुसार, शाळेतील घटनेनंतर जवळच्या एका घरात आणखी दोन मृतदेह सापडले. या घराचा संबंध या प्रकरणाशी असण्याची शक्यता आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल होताच संपूर्ण शाळेत शोधमोहीम राबवण्यात आली. तपासादरम्यान अनेक पीडित आढळून आले. संशयित गोळीबार करणारा व्यक्तीही मृत अवस्थेत सापडला असून, त्याने स्वतःवर गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
RCMP चे वरिष्ठ अधिकारी केन फ्लॉइड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, संशयिताची ओळख पटली असली तरी सध्या नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. “हा हल्ला का झाला, यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आम्ही अजून तपास करत आहोत,” असं त्यांनी सांगितलं.
या घटनेनंतर शाळेसह परिसरातील प्राथमिक शाळेतही तातडीने लॉकडाऊन करण्यात आले आहे. जखमींना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात हलवण्यात आलं. काही जणांना रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
सुमारे 2,400 लोकसंख्या असलेलं टंबलर रिज हे शहर व्हँकुव्हर पासून सुमारे हजार किलोमीटर दूर आहे. येथील माध्यमिक शाळेत इयत्ता 7 ते 12 पर्यंत जवळपास 175 विद्यार्थी शिकतात.
स्थानिक नेत्या लॅरी न्यूफेल्ड यांनी सांगितलं की, मोठ्या प्रमाणावर पोलीस दल, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा या भागात पाठवण्यात आल्या आहेत. मात्र सुरू असलेल्या कारवाईच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक तपशील देणं सध्या शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. शाळेमध्ये झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. प्रशासनाकडून तपास सुरू असून, मृतांच्या कुटुंबीयांना मदत आणि जखमींवर उपचार सुरु आहेत.

