

Trump's Tariff threat : ब्रिक्स हे उदयोन्मुख आणि विकसनशील राष्ट्रांसाठी सहकार्याचे एक व्यासपीठ आहे आणि ते कोणत्याही विशिष्ट देशाच्या विरोधात नाही. ब्रिक्सला संघर्षात रस नाही: अतिरिक्त आयात शुल्काचा वापर करणे कोणाच्याही हिताचा नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज (दि.७ जुलै) स्पष्ट केले. ब्रिक्स परिषदेतील जाहीरनाम्यानंतर ट्रम्प यांनी दिलेल्या अतिरिक्त १० टक्के कर वाढीच्या धमकीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी पत्रकार परिषदेत चीनची भूमिका स्पष्ट केली.
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "जो कोणताही देश ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांसोबत जाईल, त्याच्यावर १०% अतिरिक्त जकात आकारली जाईल. या धोरणाला कोणताही अपवाद असणार नाही. या प्रकरणी लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!" असे ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले. ट्रम्प यांनी अतिरिक्त कराची धमकी दिली असली तरी अमेरिकाविरोधी धोरण कोणती याबाबत स्पष्ट केलेले नाही.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी एका नियमित पत्रकार परिषदेत सांगितले की, ब्रिक्स समूह हा खुलेपणा, सर्वसमावेशकता आणि सर्वांसाठी लाभदायक सहकार्याला प्रोत्साहन देतो. हे एक उदयोन्मुख आणि विकसनशील राष्ट्रांसाठी सहकार्याचे व्यासपीठ आहे. ते कोणत्याही विशिष्ट देशाच्या विरोधात नाही. आयात शुल्काचा वापर करणे कोणाच्याही हिताचे नाही."
ब्रिक्स नेत्यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "व्यापार-प्रतिबंधक कृतींचा प्रसार, मग तो जकातींमधील अविवेकी वाढ असो किंवा इतर गैर-जकात उपाययोजना, यामुळे जागतिक व्यापारात आणखी घट होण्याचा, जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व व्यापारी घडामोडींमध्ये अनिश्चितता निर्माण होण्याचा धोका आहे." गटाने नियमांवर आधारित, खुली, पारदर्शक, न्याय्य, सर्वसमावेशक आणि न्यायसंगत बहुपक्षीय व्यापार प्रणालीला आपला पाठिंबा पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. विकसनशील सदस्यांना विशेष आणि वेगळी वागणूक देण्याच्या तत्त्वालाही आमचा पाठिंबा आहे," असे या घोषणापत्रात म्हटले आहे.
२००९ मध्ये स्थापन झालेल्या ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन यांचा समावेश होता, नंतर दक्षिण आफ्रिकाही त्यात सामील झाला. गेल्या वर्षी या गटाचा विस्तार होऊन त्यात इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचाही समावेश झाला.ब्रिक्स आता एक शक्तिशाली गट म्हणून उभा राहिला आहे, जो ११ प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना एकत्र आणतो. या देशांची एकत्रित लोकसंख्या जगाच्या जवळपास निम्मी (४९.५ टक्के) आहे, जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) त्यांचा वाटा सुमारे ४० टक्के आहे आणि जागतिक व्यापारात अंदाजे २६ टक्के आहे.