Bungee Jumping Viral Video: बंजी जम्पिंग करताना सुरक्षा दोरीच बांधायला विसरले; २१ वर्षीय तरुणीचा १३० फूट दरीत कोसळून मृत्यू

धाडसी खेळाची आवड एका २१ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतली. बंजी जंपिंग करताना सुरक्षा दोरी बांधण्यास विसरल्यामुळे सुमारे १३० फूट उंचीवरून पडून तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
Bungee Jumping Viral Video
Bungee Jumping Viral Videofile photo
Published on
Updated on

Bungee Jumping accident brazil video viral

ब्राझील: धाडसी खेळाची आवड एका २१ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतली. ब्राझीलमधील लिमेइरा भागात बंजी जंपिंग करताना सुरक्षा दोरी बांधण्यास आयोजक विसरल्यामुळे सुमारे १३० फूट उंचीवरून पडून एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मारिया एडुआर्डा रॉड्रिग्ज डी फ्रिटास असे या मृत तरुणीचे नाव आहे. साओ पाउलो राज्यातील साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'सांगाडा पूल' येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली.

सुरक्षा दोरी न बांधताच मारली उडी

मारिया बंजी जम्पिंगसाठी प्लॅटफॉर्मवर तयार झाली होती. तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी तिला उडी मारण्यास सांगितले; मात्र तिची सुरक्षा दोरी उपकरणाशी व्यवस्थित जोडलीच नव्हती. मारियाने प्लॅटफॉर्मवरून उडी मारताच ती थेट १३० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

Bungee Jumping Viral Video
Viral Video: हॉटेलमध्ये पतीसोबत दिसली प्रेयसी; पत्नी भडकली, भररस्त्यात तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

‘..मला पुलावरून उडी मारण्याची परवानगी कोणी दिली?’; मृत्यूपूर्वीची इन्स्टाग्राम पोस्ट

उडी मारण्याच्या काही मिनिटे आधी मारियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने गंमतीने लिहिले होते की, "मला पुलावरून उडी मारण्याची परवानगी देणारा तो वेडा माणूस कोण होता?" परंतु, ही तिची शेवटची पोस्ट ठरेल, अशी कल्पनाही कोणाला नव्हती. तिच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच तिचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले. मारिया शारीरिक शिक्षण आणि क्रीडा व्यवस्थापन शाखेची पदवीधर होती. तिला निसर्गाची आणि साहसी खेळांची प्रचंड आवड होती.

सोशल मीडियावर ती तिच्या दैनंदिन जीवनातील फोटो तसेच शारीरिक शिक्षण, निसर्ग आणि आरोग्य-कल्याण यांच्याशी संबंधित पोस्ट्स शेअर करत असे. तिने नुकतेच शारीरिक शिक्षण आणि क्रीडा व्यवस्थापन या विषयात पदवी पूर्ण केली होती. ती ग्रेटर साओ पाउलोमधील जंदिरा येथील रहिवासी होती.

"अरे देवा, दोरी कुठे आहे!"

या अपघाताचा एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये आयोजक मारियाला प्लॅटफॉर्मकडे घेऊन जाताना दिसत आहेत. तिने उडी मारताच, सुरक्षा दोरी जोडली नसल्याचे तिथे उपस्थित असलेल्यांच्या लक्षात आले. व्हिडिओमध्ये लोक "अरे मित्रांनो, दोरी कुठे आहे!" असे ओरडताना स्पष्ट ऐकू येत आहे.

आयोजकांचा पळ काढण्याचा प्रयत्न; ६ जणांना अटक

या अपघातानंतर मारियाच्या होणाऱ्या पतीला मोठा धक्का बसला आणि त्याची प्रकृती खालावली, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे, गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने या खेळाचे आयोजन करणारे दोन मुख्य आरोपी घटनास्थळावरून पळून जंगलात लपले होते. मात्र, पोलिसांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम राबवून त्यांना शोधून काढले. या प्रकरणाशी संबंधित एकूण ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास लिमेइरा येथील पोलीस करत असून, सुरक्षा उपकरणांची जबाबदारी नेमकी कोणाची होती आणि आवश्यक नियमांचे पालन केले गेले होते की नाही, याचा कसून शोध घेतला जात आहे.

Bungee Jumping Viral Video
Viral Video: भर मांडवात नवरीने नवरदेवाला सोडून प्रियकराला घातला हार अन् गेली पळून; पाहुण्यांचा राडा! व्हिडिओ व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news