

viral wedding video
छिंदवाडा: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया भागात एका विवाह सोहळ्यात चित्रपटालाही मागे टाकेल असा थरार पाहायला मिळाला. लग्नाचे सर्व विधी सुरू असतानाच, ऐन वरमालेच्या वेळी नवरीने नवरदेवाला सोडून थेट तिथेच उपस्थित असलेल्या आपल्या प्रियकराच्या गळ्यात हार घातला आणि तिथून पळ काढला. या अनपेक्षित प्रकारामुळे वऱ्हाडी मंडळी अवाक झाली, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना २२ आणि २३ एप्रिलच्या दरम्यान घडली. परासिया येथून नवरदेवाची वरात वाजतगाजत विवाहस्थळी पोहोचली होती. लग्नाची तयारी पूर्ण झाली होती आणि दोन्ही बाजूचे पाहुणे आले होते. मुख्य सोहळ्याचा क्षण आला आणि नवरदेव-नवरीला वरमालेसाठी स्टेजवर बोलावण्यात आले. मात्र, नवरदेवाच्या गळ्यात माळ घालण्याऐवजी नवरीने अचानक पाहुण्यांमध्ये उभ्या असलेल्या एका तरुणाच्या गळ्यात हार घातला आणि त्याला मिठी मारली.
नवरीच्या या कृत्यामुळे लग्नमंडपात एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी त्या तरुणाला बेदम मारहाण करत मंडपातून हाकलून दिले. या गोंधळामुळे संतप्त झालेल्या नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला आणि आपले वऱ्हाड घेऊन तो तिथून निघून गेला.
या प्रकरणाबाबत उमरेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय ठाकूर यांनी सांगितले की, "ही घटना एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडली असून आता त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुलगा आणि मुलगी दोन्ही सज्ञान असल्याने यात पोलिसांची भूमिका मर्यादित होती. नवरदेव पक्षाने कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, परतताना त्यांनी लेखी स्वरूपात कळवले आहे की, या प्रकारामुळे मुलीकडचे लोक संतप्त आहेत. भविष्यात मुलगी किंवा तिच्या मित्रासोबत काही अघटित घडल्यास त्याला आम्ही जबाबदार नसू."