

Pakistan FC headquarters attack:
नवी दिल्ली : बलुचिस्तानमधील चगाई येथे रविवारी एका भीषण बॉम्बस्फोटात ६ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला. हा हल्ला चीनच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर झाला, ज्याच्या संरक्षणासाठी पाकिस्तानी सैन्य तैनात होते. बलुच लिब्रेशन फ्रंट (BLF) या फुटीरतावादी संघटनेच्या एका महिला आत्मघाती हल्लेखोराने हा हल्ला घडवून आणला.
BLF ने हा हल्ला करणाऱ्या महिलेची माहिती जाहीर केली आहे. झरीना रफीक उर्फ ट्रांग महू असे आत्मघाती बॉम्बरचे नाव होते, जिने पाकिस्तानी सैनिकांसह स्वतःला बॉम्बने उडवले. मात्र, पाकिस्तान सरकारने या हल्ल्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
हा हल्ला बलुचिस्तानमधील चगाई येथे असलेल्या फ्रंटियर कॉर्प्सच्या अतिसुरक्षित इमारतीवर करण्यात आला. या इमारतीत चीनचा तांबे आणि सोन्याच्या खाण प्रकल्पाचे केंद्र आहे. या प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानची 'फ्रंटियर कॉप' युनिट तैनात होती. BLF ने प्रथमच अशा प्रकारचा आत्मघाती हल्ला केला आहे. या फुटीरतावादी गटाने यापूर्वी 'जाफर एक्सप्रेस'चे अपहरणही केले होते.
BLF ने २८ ते २९ नोव्हेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले. २९ हल्ल्यांमध्ये २७ पाकिस्तानी लष्करी जवान मारले गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. बीएलएने महामार्गांचा ताबा घेतल्याचे आणि शस्त्रे जप्त केल्याचेही एका निवेदनात म्हटले आहे.