

Black Sea tanker attack
इस्तंबूल: एकीकडे अमेरिकेने इराणवरील हल्ले स्थगित केले असतानाच दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धाच्या छायेखाली असलेल्या ब्लॅक सीमध्ये आज (दि. २६) पहाटे एका तेलवाहू टँकरवर भीषण हल्ला झाला. रशियातून कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या आणि तुर्कीच्या कंपनीमार्फत चालवल्या जाणाऱ्या या जहाजावर 'अनमॅन्ड सरफेस व्हेईकल' (USV) म्हणजेच मानवरहित सागरी नौकेद्वारे हल्ला झाल्याचा संशय तुर्कीचे परिवहन मंत्री अब्दुलकादिर उरालोग्लू यांनी व्यक्त केला आहे.
मंत्री उरालोग्लू यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना सांगितले की, "सिएरा लिओनचा ध्वज असलेल्या आणि तुर्की कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या या जहाजाने रशियातून कच्चे तेल भरले होते. मध्यरात्रीनंतर जहाजाच्या इंजिन रूममध्ये स्फोट झाल्याची माहिती आमच्या आपत्कालीन केंद्राला प्राप्त झाली."
"आमच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा हल्ला जाणीवपूर्वक इंजिन रूमला लक्ष्य करून करण्यात आला आहे. हा हल्ला आकाशातील ड्रोनद्वारे नाही, तर पाण्याच्या पातळीवरून चालणाऱ्या मानवरहित सागरी नौकेद्वारे (USV) करण्यात आला असावा."
हा हल्ला तुर्कीच्या सागरी हद्दीत झाला की नाही, याबाबत मंत्र्यांनी स्पष्टपणे काही सांगितले नाही. मात्र, स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना बॉस्फोरस सामुद्रधुनीपासून ३० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर घडली आहे. जहाजाला पूर्णपणे निकामी करण्याच्या उद्देशानेच हा बाह्य स्फोट घडवून आणल्याचे दिसून येत आहे. सध्या तुर्कीने घटनास्थळी आवश्यक सुरक्षा पथके तैनात केली असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून तुर्कीने युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांशी जवळचे संबंध राखले आहेत. मात्र, गेल्या डिसेंबर महिन्यापासून ब्लॅक सीमध्ये संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी यापूर्वीच ब्लॅक सीचे रूपांतर 'संघर्ष क्षेत्रात' होऊ नये, असा इशारा दिला होता.
उत्तर किनारपट्टीवर युक्रेन आणि रशियाने बळकावलेला क्रिमिया भाग असल्याने तुर्कीसाठी या भागातील सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. या ताज्या हल्ल्यामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी आणि सागरी सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे.