BBC Layoff: BBC मध्ये मोठी नोकरकपात? तब्बल २००० लोकांची नोकरी जाणार; कोणावर आहे टांगती तलवार?

BBC Layoff
BBC LayoffPUDHARI
Published on
Updated on

BBC Layoff: जागतिक स्तरावरील आघाडीची वृत्तवाहिनी असणाऱ्या 'ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन' (BBC) मध्ये आगामी काळात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात होण्याची शक्यता आहे. खर्च कमी करण्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी बीबीसी प्रशासनाने हे मोठे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. 'फायनान्शियल टाइम्स' (FT) ने दिलेल्या एका अहवालानुसार, बीबीसी आपल्या एकूण मनुष्यबळ खर्चात जवळपास १० टक्क्यांची कपात करणार असून, या अंतर्गत सुमारे २,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची दाट शक्यता आहे. सरकारसोबत भविष्यातील निधीविषयी (Funding) होणाऱ्या चर्चेपूर्वी वाढत्या आर्थिक दबावाचा सामना करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.

BBC Layoff
Meta layoffs 2026 | पहाटे ४ वाजता येणार 'तो' ईमेल; 'मेटा'मधील ८,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली, 'कपाती'चे काउंटडाउन सुरू!

सध्या जगभरात बीबीसीचे २० हजारपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. या नियोजित नोकरकपातीचा परिणाम अनेक विभागांवर होणार असला, तरी बीबीसीच्या 'न्यूज डिव्हिजन'ला (वृत्त विभाग) याचा पहिला आणि सर्वात मोठा फटका बसेल असे बोलले जात आहे.

BBC Layoff
TCS appraisal band d : TCS ने कर्मचाऱ्यांना 'कोटा' सिस्टमनं टाकलं lowest performance श्रेणीत; मॅनेजर्सना होतं टार्गेट

बीबीसीच्या वृत्त विभागावर टांगती तलवार

अहवालानुसार, बीबीसीचा वृत्त विभाग येत्या काही दिवसांत आपल्या खर्चात कपात करण्याची अधिकृत योजना जाहीर करू शकतो. बीबीसीच्या एकूण मनुष्यबळापैकी २५ टक्के कर्मचारी केवळ वृत्त विभागात कार्यरत आहेत. हा विभाग टेलिव्हिजन न्यूज, रेडिओ सेवा, डिजिटल वेबसाईट्स, मोबाईल ॲप्लिकेशन्स आणि प्रादेशिक कामकाजाचे नियंत्रण करतो. विभागाचा आकार आणि व्याप्ती मोठी असल्याने, एकूण नोकरकपातीचा मोठा हिस्सा या विभागातून केला जाईल. या बदलांच्या प्रक्रियेत काही लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमांनाही फटका बसू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

BBC Layoff
Tech Layoffs 2026: IT क्षेत्राचा सुवर्णकाळ संपला? 14 दिवसांत 25 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या; कारण काय?

नेमकी का होतेय ही कपात?

बीबीसीने यापूर्वीच पुढील दोन वर्षांत आपल्या खर्चात सुमारे ५०० दशलक्ष पाउंड्स (£500 million) म्हणजेच सुमारे ५ हजार कोटी रुपयांची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. बदलत्या प्रेक्षकांच्या सवयी, तंत्रज्ञानातील बदल, वाढता मॅनेजमेंट खर्च आणि सातत्याने जाणवणारी आर्थिक चणचण यांमुळे वार्षिक बजेटमध्ये १० टक्के कपात करणे अनिवार्य झाले आहे.

या नोकरकपातीव्यतिरिक्त, बीबीसीने आधीच अनेक अंतर्गत खर्च कमी केले आहेत. यामध्ये प्रवासावरील खर्च, नवीन भरतीवरील बंदी, कन्सल्टन्सी सेवा, परिषदा, विविध पुरस्कार सोहळे आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांवरील खर्चाला मोठ्या प्रमाणात कात्री लावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यम क्षेत्रात या मोठ्या बदलांमुळे सध्या चिंतेचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news