

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर बांगला देशात नव्याने हिंसाचार (Bangladesh Violence) भडकला असून या हिंसाचारात आता थेट हिंदूंनाच टार्गेट करण्यात येत आहे. बांगलादेशचे सांस्कृतिक केंद्र ढाका येथे हल्लेखोरांनी हिंदू गायक राहुल आनंद (Rahul Anand) यांच्या निवासस्थानाची तोडफोड, लूट आणि जाळपोळ केली. या हल्ल्यात आनंद, त्यांची पत्नी आणि मुलगा पळून जाण्यात यशस्वी झाले.
बांगला देशात हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना (sheikh hasina) देशातून निघून गेल्यानंतर हिंदूंची शेकडो घरे, व्यवसाय आणि मंदिरांची तोडफोड (Bangladesh Violence) करण्यात आली आहे. बांगला देशातील २७ जिल्ह्यांतील हिंदू नागरिकांवर हल्ले करण्यात येऊन त्यांच्या मालमत्ता जाळण्यात आल्या आहेत. बांगला देशातील या राजकीय उलथापालथीत आगामी काळात हिंदूंनाच लक्ष्य केले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गायक राहुल आनंद (Rahul Anand) यांचे घरही जमावाने पेटवून दिले. राहुल आनंदा यांच्या निवासस्थानी वर्षभर विविध कार्यक्रमांसाठी संगीत रसिकांची गर्दी असायची. १४० वर्षे जुन्या या घरात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सप्टेंबर २०२३ मध्ये ढाकाला भेट दिली तेव्हा एक दिवस राहिले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आनंद (Rahul Anand) यांच्या ढाका येथील घराला सोमवारी दुपारी लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात आनंद, त्याची पत्नी आणि मुलगा पळून गेले. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्या घरात लुटमार केली. जमावाने आनंद यांच्या घरातून ३ हजार वाद्येही चोरून नेली. बांगलादेशातील 'द डेली स्टार'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'आनंद यांच्या जवळच्या सहाय्यकाने सांगितले की, हल्लेखोरांनी आधी गेट तोडले आणि नंतर घराची नासधूस सुरू केली. फर्निचरपासून मौल्यवान वस्तूंपर्यंत सर्व काही पळवून नेले. यानंतर त्यांनी वाद्यांसह संपूर्ण घर पेटवून दिल्याचे त्यांनी सांगितले. आनंद आणि त्यांचे कुटुंब हल्ल्यामुळे हादरले असून त्यांनी एका गुप्त ठिकाणी आश्रय घेतला आहे, असे 'जोलर गान' चे संस्थापक सदस्य सैफुल इस्माल जर्नल यांनी सांगितले.