

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगला देशात अराजक (bangladesh protests) माजल्यानंतर पलायन केलेल्या शेख हसीना सोमवारी भारतात आल्या असून त्यांना तूर्तास दुसऱ्या देशात राजाश्रय न मिळाल्याने त्या काही दिवस भारतातच राहणार आहेत. दुसरीकडे बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री अंतरिम सरकारच्या प्रमुखाची नियुक्ती करण्यात आली. नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस (muhammad yunus) यांना बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख बनवण्यात आले आहे. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी युनूस यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
सोमवारी दुपारी हजारो आंदोलक (bangladesh protests) पंतप्रधान निवासस्थानावर चाल करून आल्यानंतर शेख हसीना यांनी लष्कराशी चर्चा करून देश सोडण्याचा निर्णय घेतला व त्या लष्कराच्या विमानाने भारताकडे रवाना झाल्या. सायंकाळी दिल्लीनजीकच्या हिंडोन या हवाई दलाच्या विमानतळावर त्या दाखल झाल्या. त्यांना ब्रिटनमध्ये आश्रय हवा आहे. ब्रिटनने त्यांना राजाश्रय देण्याबाबत अद्याप काहीही माहिती दिलेली नाही. दुसरीकडे बांगला देशात विद्यार्थी नेत्यांनी नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ महंमद युनूस यांना पंतप्रधानपदी नेमावे, अशी मागणी केली आहे. मंगळवारी रात्री उशीरा राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी युनूस यांना अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. विद्यार्थी आंदोलनाचे नेते आणि समन्वयक यांच्यात झालेल्या बैठकीत अंतरिम सरकार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत तिन्ही लष्कराचे प्रमुखही उपस्थित होते.