Sheikh Hasina extradition
ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या मुद्द्यावरून भारत किंवा अन्य कोणताही देश बांगलादेशवर कोणत्याही अटी लादू शकत नाही, असा स्पष्ट इशारा बांगलादेशने दिला आहे. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांचे माहिती सल्लागार जाहिद उर रहमान यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली.
ढाका सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताने दोन अटी घातल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना रहमान यांनी बांगलादेशची भूमिका स्पष्ट केली.
बांगलादेश हा आता स्वतंत्र आणि सार्वभौम देश असून तो भक्कम कायदेशीर पायावर उभा आहे. त्यामुळे कोणत्याही अनुचित अटी आम्ही मान्य करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्याचबरोबर, शेख हसीना यांच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेत भारत कोणत्याही पूर्वअटी घालणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थी आंदोलनानंतर सत्तांतर झाल्यापासून शेख हसीना भारतात आश्रयाला आहेत, हे उल्लेखनीय. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, हसीना यांचे प्रत्यार्पण ही कायदेशीर प्रक्रिया असून, ती नियमानुसारच पार पाडली जाईल. तसेच, भारताला बांगलादेशसोबत सकारात्मक, रचनात्मक आणि दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असेही त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे.