

ढाका : बांगला देशात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला हिंसाचाराचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाही. 18 डिसेंबर रोजी उस्मान हादी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या या हिंसाचारात आता अल्पसंख्याक हिंदू समुदायाला वारंवार लक्ष्य केले जात आहे. पत्रकार राणा प्रताप बैरागी यांच्या हत्येला 24 तास पूर्ण व्हायच्या आतच एका व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सोमवारी रात्री नरसिंग्दी येथे किराणा दुकानदार सरत मणी चक्रवर्ती हे रक्तपिपासू हिंसक जमावाचे बळी ठरले. 35 दिवसांच्या कालावधीत किमान 11 हिंदूंची हत्या झाली असून, यात एका स्वातंत्र्यसैनिकाचाही समावेश आहे.
सोमवारी जशोरच्या मनिरामपूर भागात हिंदू पत्रकार राणा प्रताप बैरागी (वय 45) यांची हत्या करण्यात आली. बैरागी हे एका फॅक्टरीचे मालक आणि ‘बीडी खबोर’चे कार्यकारी संपादक होते. कोपलिया बाजार परिसरात हल्लेखोरांनी त्यांना फॅक्टरीबाहेर बोलावले, त्यांच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यानंतर गळा चिरून त्यांची हत्या केली. त्यानंतर सरत मणी चक्रवर्ती यांचीही हत्या झाल्याचे वृत्त आले. चक्रवर्ती हे अनेक वर्षे दक्षिण कोरियात काम केल्यानंतर काही काळापूर्वीच बांगला देशात परतले होते. नरसिंग्दी येथील बाजारपेठेत त्यांच्यावर हल्ला झाला, रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
बांगला देशात गेल्या काही दिवसांपासून हिंदू समुदायाला लक्ष्य केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 5 जानेवारी रोजी ‘हिंदू वृत्तपत्र’चे संपादक आणि एका व्यापाऱ्याच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. गारमेंट फॅक्टरीतील कामगार दीपू चंद्र दास या हत्यासत्राचा पहिला बळी ठरला. 18 डिसेंबर रोजी दीपू चंद्र दास यांच्या अमानुष हत्येनंतर हिंसाचाराचे हे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. 35 दिवसांच्या कालावधीत किमान 11 हिंदूंची हत्या झाली असून, यात एका स्वातंत्र्यसैनिकाचाही समावेश आहे. या हत्यांची निष्पक्ष चौकशी होणार की, त्यांना केवळ अपवाद ठरवून दडपले जाणार? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गेल्यापासून (5 ऑगस्ट 2024) बांगला देशात कट्टरपंथी शक्तींचे प्राबल्य वाढले आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार या हत्यांना सांप्रदायिक मानण्यास नकार देत आहे. किंबहुना, कट्टरपंथीयांना अप्रत्यक्षपणे सरकारचा पाठिंबा असल्याचा आरोप तेथील हिंसेला बळी पडलेल्या समाजाकडून होत आहे; तर सरकारकडून या घटनांना अपवाद किंवा वैयक्तिक वाद म्हणून संबोधले जात आहे. ‘हिंदूज फॉर ह्युमन राईटस्’सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी केली आहे.
पोलिस हतबल; कट्टरपंथीयांची मुजोरी
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये अँटी-डिस्क्रिमिनेशन स्टुडंट मूव्हमेंटचे नेते पोलिसांना उघडपणे धमकावताना दिसत आहेत. ‘आम्ही पोलिस ठाणे जाळले आणि हिंदू पोलिस अधिकाऱ्याला जिवंत जाळले, हे विसरू नका,’ अशी कबुली ते कॅमेऱ्यासमोर देत आहेत. यावरून बांगला देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट झाली आहे, हे स्पष्ट होते. भारत सरकारनेही या वाढत्या हिंसाचाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
हिंसाचाराचा घटनाक्रम
2 डिसेंबर 2025 : नरसिंगडी जिल्ह्यात सुवर्ण व्यापारी प्रंतोष कर्मोकार यांची गोळ्या झाडून हत्या. त्याच दिवशी फरिदपूरमध्ये मासळी व्यापारी उत्पल सरकार यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
7 डिसेंबर 2025 : रंगपूरमध्ये 1971 च्या मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक जोगेश चंद्र रॉय आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा रॉय यांचा गळा चिरून खून.
12 डिसेंबर 2025 : कुमिल्ला जिल्ह्यात 18 वर्षीय रिक्षाचालक शांतो चंद्र दास यांचा मृतदेह मक्याच्या शेतात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला.
18 डिसेंबर 2025 : मैमनसिंगमध्ये कापड उद्योग कामगार दीपू चंद्र दास यांची जमावाकडून अमानुष हत्या करून मृतदेह महामार्गावर जाळण्यात आला. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त झाला.
24 डिसेंबर 2025 : राजबारी जिल्ह्यात जमावाच्या मारहाणीत अमृत मंडल यांचा मृत्यू.
29 डिसेंबर 2025 : मैमनसिंगमधील एका कारखान्यात ‘अन्सार वाहिनी’चे सदस्य बजेंद्र बिस्वास यांची त्यांच्याच सहकाऱ्याकडून गोळी झाडून हत्या.
3 जानेवारी 2026 : शरियतपूरचे व्यापारी खोकन चंद्र दास यांचा उपचारांदरम्यान मृत्यू.
31 डिसेंबर रोजी त्यांना पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले होते.
5 जानेवारी 2026 : जेसोर जिल्ह्यात हिंदू संपादक राणा प्रताप बैरागी यांची गोळ्या झाडून आणि गळा चिरून हत्या. त्याच दिवशी नरसिंग्दी येथे किराणा दुकानदार सरत मणी चक्रवर्ती यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला.