

ढाका; वृत्तसंस्था : बांगला देशात अल्पसंख्याक हिंदू समाजावरील हल्ल्यांची मालिका सुरूच असून, सोमवारी सायंकाळी स्थानिक वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक असणार्या हिंदू उद्योजकाची हल्लेखोरांनी डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. दरम्यान, अन्य एका घटनेत झेनैदाह जिल्ह्यात जमिनीच्या वादातून एका हिंदू विधवेवर सामूहिक बलात्कार करून तिला झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर पीडितेचे केस कापून या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल केला.
राणा प्रताप (वय 45) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते एका आईस फॅक्टरीचे मालक होते. ही घटना जशोर जिल्ह्यातील मणिरमपूर उपजिल्ह्यातील कोपालिया बाजार परिसरात घडली. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. हल्लेखोर मोटारसायकलवरून आले होते. त्यांनी राणा प्रताप यांना त्यांच्या आईस फॅक्टरीमधून बाहेर बोलावले आणि जवळच्या एका गल्लीत नेले. तिथे त्यांच्यात थोडा वेळ वाद झाला आणि त्यानंतर हल्लेखोरांनी प्रताप यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडली व घटनास्थळावरून पळ काढला. या अनपेक्षित हल्ल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
राणा प्रताप हे गेल्या दोन वर्षांपासून कोपालिया बाजार परिसरात आपली आईस फॅक्टरी चालवत होते. व्यवसायासोबतच ते पत्रकारितेतही सक्रिय होते. नरैल जिल्ह्यातून प्रकाशित होणार्या ‘डेली बीडी खबर’ या वृत्तपत्राचे ते कार्यकारी संपादक म्हणूनही काम पाहत होते. वृत्तपत्राचे वृत्तसंपादक, अबुल काशेम यांनी सांगितले की, प्रताप यांच्यावर पूर्वी काही खटले होते; परंतु त्या सर्वांमधून त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, हे सांगता येणार नाही.
झेनैदाह जिल्ह्यात बलात्कार
एका हिंदू विधवा महिलेने अडीच वर्षांपूर्वी स्थानिक शाहीन नावाच्या व्यक्तीकडून सुमारे 20 लाख टाकांना जमीन आणि घर खरेदी केले होते. तेव्हापासून शाहीन तिचा छळ करत होता. शनिवारी सायंकाळी, शाहीन आणि हसन नावाच्या दुसर्या आरोपीने पीडितेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी तिला घराबाहेरील झाडाला बांधले, तिचे केस कापले आणि या कृत्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पसरवला. या अत्याचारामुळे पीडिता बेशुद्ध पडली, त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तिची सुटका करून तिला रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.