

दिल्ली : पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. भारतावरील हल्ल्याचा फोटो म्हणून पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना एक जुना फोटो भेट दिला आहे. जो प्रत्यक्षात चीनच्या २०१९ मधील लष्करी सरावाचा आहे. मात्र, हा फोटो पाकिस्तानने भारतावर केलेला हल्ल्याचा आहे, असा दावा केला आहे.
भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे शेअर केले आहेत, ज्यामध्ये पाक हवाई तळांचे झालेले नुकसान स्पष्ट दिसून येते. मात्र, याउलट पाकिस्तानने नेहमीप्रमाणे २०१९ मधील एक चिनी लष्करी सरावाचा फोटो वापरून त्यांना कधीही मिळू न शकलेलं, खोटं यश दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा फोटो 'PHL-03' या चिनी बनावटीच्या मल्टीपल रॉकेट लाँचरचा आहे. तो २०१९ मध्येच शेअर करण्यात आला होता. गेल्या पाच वर्षांत अनेक वेळा हा फोटो वापरला गेलेला आहे. मूळ फोटो छायाचित्रकार हुआंग हाय याने काढला होता.
असीम मुनीर यांनी आयोजित केलेल्या एका खास डिनरदरम्यान हा फोटो शेहबाज शरीफ यांना देण्यात आला. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लगेचच निदर्शनास आणून दिले की, हा फोटो पाकिस्तानच्या ऑपरेशन बन्यान अल-मारसूसचा नाही तर २०१९ च्या चिनी सरावाचा आहे.
एका वापरकर्त्यांनने लिहिले आहे की, "शेहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखांना ऑपरेशन बुनियान म्हणून दिलेला फोटो चिनी सरावाचा आहे. त्यांना गुगल इमेज सर्च वापरता येत नाही वाटतं. दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, पाक पंतप्रधानांना आसिम मुनीर यांनी २०१९ च्या चिनी लष्करी सरावाचा एक फोटो भेट दिला. भारताविरुद्ध विजयाचा हा खोटारडेपणा. त्याऐवजी, भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान अचूकता आणि शक्तीने केलेल्या हल्ल्यांचे पुरावे दिले. फसवणूक आणि भ्रम हेच पाकिस्तानचे धोरण राहिले आहे."