

Ashley Tellis Arrest :
भारतीय वंशाचे संरक्षण रणनितीकार आणि परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक अॅश्ले जे टेलीस यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर संरक्षण विषयक संवेदनशील माहिती बेकायदेशीपणे जवळ बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याबाबतची माहिती वेस्टन व्हर्जिनियाच्या युएस अटॉर्नी ऑफीसनं दिली आहे. त्यांना या प्रकरणी अटक देखील झाली आहे.
तपासकर्त्यांना त्यांच्या व्हर्जिनिया येथील घरी 'टॉप सिक्रेट' आणि 'सिक्रेट' दर्जाची हजारो पाने मिळाली आहेत. याव्यतिरिक्त, व्यावसायिक आणि शैक्षणिक देवाणघेवाणीदरम्यान टेलिस यांनी अनेक वेळा चिनी अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे. त्यांना राष्ट्रीय संरक्षण माहिती बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याबद्दल दोषी ठरल्यास दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
६४ वर्षाचे टेलीस हे टाटा चेअर फॉर स्ट्रॅटेजिक अफेअर्सचे ते वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना फेडरल इनव्हेस्टिगेशनने वीकएन्डला ताब्यात घेतलं. त्यांची गोपनीय सरकारी दस्तऐवज बाळगल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. अॅश्ले यांच्यावर १८ USC 793(e) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
तपास यंत्रणा अॅश्ले यांच्यावरील सुरक्षित स्थळावरून क्लासिफाईड कागदपत्रे हलवणे आणि चीनच्या अधिकाऱ्यांची भेट घेणे या आरोपांची देखील चौकशी करत आहेत. युएस अटॉर्नी लिंड्से हालिगेन यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी त्यांनी हा आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचं सांगितलं.'
जर अॅश्ले यांच्यावरील आरोर सिद्ध झाले तर त्यांना १० वर्षाचा तुरूंगवास आणि २ लाख ५० हजार डॉलर्सचा दंड होऊ शकतो. दरम्यान सरकारनं ही तक्रार त्यांच्यावरील आरोप म्हणून पाहिले जातील. ते जोपर्यंत दोषी आढळत नाही तोपर्यंत त्यांना निर्दोष मानलं जाईल असं स्पष्ट केलं आहे.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि धोरणकर्ते असलेले अॅश्ले जे. टेलिस हे दक्षिण आशियाई सुरक्षा आणि अमेरिका-भारत संबंधांवरील वॉशिंग्टनमधील प्रमुख तज्ज्ञांपैकी एक म्हणून ओळखले जातात. सध्या ते कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस येथे रणनीतिक व्यवहारविषयक टाटा चेअर आणि वरिष्ठ फेलो म्हणून कार्यरत आहेत, तसेच ते आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि आशिया खंडावर विशेष लक्ष केंद्रित करून अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचे विशेषज्ञ आहेत.
त्यांनी अमेरिकेच्या सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. ते परराष्ट्र व्यवहारविषयक उपमंत्र्यांचे (Under Secretary of State for Political Affairs) वरिष्ठ सल्लागार होते आणि त्यांनी अमेरिका-भारत नागरी अणु कराराच्या (US-India Civil Nuclear Agreement) वाटाघाटीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. याव्यतिरिक्त, त्यांनी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचे विशेष सहायक आणि धोरणात्मक नियोजन व नैऋत्य आशियाचे वरिष्ठ संचालक म्हणून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत (National Security Council) सेवा दिली आहे.
शासकीय सेवेपूर्वी, त्यांनी रँड कॉर्पोरेशनमध्ये (RAND Corporation) वरिष्ठ धोरण विश्लेषक आणि प्राध्यापक म्हणूनही काम केले. त्यांची पुस्तके, जसे की Striking Asymmetries: Nuclear Transitions in Southern Asia आणि Revising US Grand Strategy Toward China, आंतरराष्ट्रीय धोरण वर्तुळात महत्त्वाची मानली जातात.
सध्या ते कायदेशीर अडचणीत आहेत. अमेरिकन मीडियामधील वृत्तानुसार, गोपनीय सरकारी कागदपत्रे बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.