

Balochistan bus attack
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात गुरूवारी धक्कादायक घटना घडली. सशस्त्र हल्लेखोरांनी महामार्गावरून जाणाऱ्या बसमधून नऊ प्रवाशांचे अपहरण केले आणि नंतर त्यांची डोंगराळ भागात नेऊन निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.
प्रांतीय सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी सशस्त्र हल्लेखोरांनी अनेक बसेस थांबवून त्यातील प्रवाशांचे अपहरण केले. यानंतर, हल्लेखोर या प्रवाशांना जवळच्या डोंगराळ आणि दुर्गम भागात घेऊन गेले. रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेनंतर आज (दि. ११) सकाळी नऊ प्रवाशांचे मृतदेह सापडले, त्यांच्या शरीरावर गोळ्या झाडल्या होत्या.
अद्याप कोणत्याही दहशतवादी किंवा फुटीरतावादी गटाने या अमानुष हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, यापूर्वी अशाच प्रकारच्या घटनांमध्ये फुटीरतावादी बलोच दहशतवाद्यांचा हात असल्याचे समोर आले आहे. हे दहशतवादी प्रामुख्याने पूर्वेकडील पंजाब प्रांतातील लोकांची ओळख पटवून त्यांना लक्ष्य करतात.
अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेला लागून असलेला बलुचिस्तान प्रांत नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे, परंतु येथे अनेक दशकांपासून अशांतता आहे. या प्रदेशातील सर्वात सक्रिय बंडखोर गटांपैकी एक असलेल्या 'बलोच लिबरेशन आर्मी' (BLA) ने यापूर्वी अनेक हल्ले केले आहेत. पाकिस्तानी प्रशासन बलुचिस्तानच्या संसाधनांचा वापर पंजाब प्रांताच्या विकासासाठी करत असून स्थानिकांवर अन्याय करत असल्याचा आरोप वांशिक बलोच दहशतवादी करतात. याच असंतोषातून या प्रदेशात सातत्याने हिंसाचार आणि रक्तरंजित संघर्ष सुरू असतो.