

Trump Canada tariff 2025
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी कॅनडाच्या आयातीवर ३५ टक्के टॅरिफ (शुल्क) लावण्याची घोषणा केली आहे. हे नवीन शुल्क १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार असून, कॅनडामधून अमेरिकेत येणाऱ्या सर्व उत्पादनांवर हे लागू होईल. कॅनडाकडून होणारी प्रत्युत्तरादाखलची कारवाई आणि अयोग्य व्यापारी व्यवहार यांना प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या अधिकृत पत्रात ट्रम्प यांनी कॅनडावर लावलेल्या शुल्कामागची कारणे दिली आहेत. विशेषतः फेंटानिल या जीवघेण्या अंमली पदार्थाचा अमेरिका दिशेने होणारा प्रवाह थांबवण्यात कॅनडा अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, अन्यायकारक व्यापार धोरणांवरही त्यांनी टीका केली. “१ ऑगस्ट २०२५ पासून, कॅनडामधून अमेरिकेत येणाऱ्या उत्पादनांवर आम्ही ३५ टक्के टॅरिफ आकारू,” असे ट्रम्प यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांनी असेही लिहिले की, “अमेरिकेतील फेंटानिल संकटावर तोडगा काढण्यासाठी आम्ही हे शुल्क लावतो. कॅनडा या संकटाला थांबवण्यात अपयशी ठरला आहे.” ट्रम्प यांनी यासोबतच टॅरिफ टाळण्यासाठी काही कंपन्या माल दुसऱ्या देशातून ट्रान्सशिप करत असल्याचे सांगून इशारा दिला की, “अशा पद्धतीने टॅरिफ चुकवण्याचा प्रयत्न केल्यास त्यावरही तेवढेच शुल्क लागू होईल.”
ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, जर कॅनडाने अमेरिकेच्या या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून आपल्या उत्पादनांवरील शुल्कात वाढ केली, तर अमेरिका त्याच्या प्रतिक्रियेइतकाच किंवा त्याहून अधिक टॅरिफ लावेल. "जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव टॅरिफ वाढवला, तर तुम्ही जितके टक्के वाढवाल, तितके आम्ही ३५ टक्के मध्ये जोडू.' असे त्यांनी म्हटले आहे.
कॅनडाच्या डेअरी धोरणांवर निशाणा साधत ट्रम्प म्हणाले की, कॅनडा अमेरिकन शेतकऱ्यांवर ४०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावतो. यामुळे अमेरिकेला मोठी व्यापारी तूट सहन करावी लागत असून, हा आता राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनला आहे. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले, 'कॅनडा आमच्या डेअरी शेतकऱ्यांवर अभूतपूर्व कर लावतो. तेही अशा वेळी, जेव्हा आमच्या शेतकऱ्यांना तिथे उत्पादने विकण्याची परवानगीच मिळत नाही.'
या निर्णयासोबतच ट्रम्प यांनी कॅनडाच्या कंपन्यांना अमेरिकेत आपले युनिट्स उभारण्याचा प्रस्तावही दिला आहे. अमेरिकेत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना जलद, व्यावसायिक आणि नियमित मंजुरी मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी लिहिले, 'जर एखादी कॅनेडियन कंपनी अमेरिकेत येऊन उत्पादन करू इच्छित असेल, तर आम्ही त्यांना सर्व परवानग्या काही आठवड्यांत देऊ.'