

Apple CEO Tim Cook retirement John Ternus
नवी दिल्ली: जगातील अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी 'ॲपल' मध्ये मोठ्या नेतृत्व बदलाची घोषणा करण्यात आली आहे. ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या जागी कंपनीचे हार्डवेयर इंजिनिअरिंग प्रमुख जॉन टर्नस ही धुरा सांभाळणार आहेत.
६५ वर्षीय टिम कुक हे १ सप्टेंबर ला आपल्या पदावरून पायउतार होतील. दिग्गज स्टीव्ह जॉब्ज यांच्यानंतर टिम कुक यांनी ॲपलची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात कंपनीने यशाची नवी शिखरे सर केली. कुक यांच्या नेतृत्वाखाली आयफोनच्या लोकप्रियतेमुळे ॲपलचे बाजार मूल्य ३.६ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. १९९८ मध्ये ॲपलमध्ये रुजू झालेल्या कूक यांनी कंपनीच्या जागतिक पुरवठा साखळीवर मजबूत पकड मिळवली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली ॲपलने केवळ आयफोनवर अवलंबून न राहता एअरपॉड, ॲपल वॉच आणि सेवा क्षेत्राचा विस्तार केला. ॲपलला १ ट्रिलियन आणि त्यानंतर ४ ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यापर्यंत पोहोचवण्याचे श्रेय त्यांना जाते. मात्र, कूक यांनी उत्पादन विक्री आणि नफ्यात वाढ केली असली तरी, जॉब्ज यांच्या 'आयफोन'सारखा कोणताही क्रांतिकारी आविष्कार त्यांच्या काळात समोर आला नाही, अशी टीकाही केली जाते.
५० वर्षीय जॉन टर्नस सध्या ॲपलमध्ये हार्डवेयर इंजिनिअरिंगचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. टर्नस यांनी आयफोन, आयपॅड आणि मॅक यांसारख्या महत्त्वाच्या उत्पादनांच्या डिझाइन आणि इंजिनिअरिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टिम कुक यांनी स्वतः टर्नस यांच्यावर विश्वास दर्शवला असून त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे.
गेल्या २५ वर्षांपासून कंपनीत असलेल्या टर्नस यांनी आयफोन, मॅक आणि नुकत्याच लाँच झालेल्या 'व्हिजन प्रो' हेडसेटच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टर्नस यांची नियुक्ती ही ॲपलच्या धोरणातील बदलाचे संकेत मानले जात आहेत, जिथे कंपनी आता 'हार्डवेअर इनोव्हेशन'वर अधिक भर देऊ शकते.
टिम कुक यांच्या राजीनाम्यानंतर ॲपलमध्ये एका मोठ्या कालखंडाचा अंत होत आहे. टिम कुक यांनी कंपनीला केवळ एक तंत्रज्ञान कंपनी न ठेवता एक 'लक्झरी ब्रँड' आणि जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. आता जॉन टर्नस यांच्याकडे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील नवीन उत्पादनांच्या माध्यमातून कंपनीला पुढे नेण्याचे आव्हान असेल.