

Robert Prevost becomes the new Pope
व्हॅटिकन : व्हॅटिकन सिटीमधील सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून पांढरा धूर निघाला आहे. याचाच अर्थ कॅथोलिक चर्चच्या कार्डिनल्सनी नवीन पोपची निवड केली आहे. अमेरिकेचे ६९ वर्षीय रॉबर्ट प्रीव्होस्ट हे कॅथोलिक चर्चचे नवे पोप असतील आणि त्यांना पोप लिओ चौदावे म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा गुरुवारी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये वरिष्ठ कार्डिनल्सनी केली. रॉबर्ट प्रीव्होस्ट हे पहिले अमेरिकन पोप आहेत.
सेंट पीटर बॅसिलिकाच्या बाल्कनीतून नवीन पोप यांचे नाव जाहीर होण्यापूर्वीच, खाली जमलेल्या लोकांनी "विवा इल पापा" - लाँग लिव्ह द पोप' असा जयघोष केला.
पोप लिओ चौदावे निवडीनंतर रॉबर्ट प्रीव्होस्ट यांनी सेंट पीटर बॅसिलिकाच्या मध्यवर्ती बाल्कनीतून बाहेर जमलेल्या लोकांना हात उंचावून अभिवादन केले. "तुम्ही शांततेत जीवन जगावे! शांतीचा हा संदेश तुमच्या हृदयात राहावा, तो तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि सर्व लोकांपर्यंत पोहोचावा, जिथे ते असतील; सर्व लोकांमध्ये आणि संपूर्ण जगात शांती नांदावी." असा संदेश नवे पोप रॉबर्ट प्रीव्होस्ट यांनी रोम आणि संपूर्ण जगाला दिला.
प्रीव्होस्ट यांचा जन्म १९५५ मध्ये शिकागो येथे स्पॅनिश आणि फ्रँको-इटालियन वंशाच्या पालकांच्या घरी झाला. त्यांनी रोमन कॅथोलिक चर्चमध्ये साहाय्यक म्हणून काम केले. त्यांनी १० वर्षे पॅरिश पाद्री म्हणून आणि पेरू देशातील ट्रुजिलो येथील एका सेमिनरीमध्ये शिक्षक म्हणून काम केले. त्यांच्याकडे पेरुचे नागरिकत्व आहे. त्यांना उपेक्षित समुदायांसाठी काम करणारे व्यक्ती म्हणून ओळखले जाते.
२०१४ मध्ये त्यांची पेरूमधील चिकलायोचे बिशप म्हणून निवड करण्यात आली. जानेवारी २०२३ मध्ये आर्चबिशप आणि काही महिन्यांतच त्यांना कार्डिनल बनवले. प्रीव्होस्ट यांचे विचार स्थलांतरित, गरीब आणि पर्यावरणाबद्दल फ्रान्सिस यांच्या विचारांशी मिळते-जुळते असल्याचे मानले जाते.