

Amazon Jobs Robot replace Human at workplace
वॉशिंग्टन : अमेरिकेतील जॉब मार्केटमध्ये ॲमेझॉन या टेक जायंट कंपनीनं गेल्या दशकभरात जेवढं योगदान दिलं आहे त्याच्या जवळपासही कोणी नाही. मात्र आता लाखो हातांना काम देणाऱ्या या ॲमेझॉन कंपनीच्या अंतर्गत धोरणात्मक कागदपत्र आणि मुलाखतींमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती द न्यू यॉर्क टाईम्सच्या हाती लागली असून त्यानुसार ॲमेझॉन कंपनीने ऑटोमेशनवर भर दिला असून तब्बल कंपनीतील ५ लाखापेक्षा जास्त जॉब्स हे रोबोट्स रिप्लेस करतील.
ॲमेझॉनची अमेरिकेतील वर्कफोर्स ही २०१८ पासून तिप्पट झाली आहे. त्यांच्याकडे सध्या अमेरिकेत जवळपास १२ लाख लोकं काम करतात. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संचालकीय मंडळाला गेल्या वर्षी कागदपत्र सादर केली होती. यात नवीन नोकरभरती करण्याऐवजी ऑटोमेशनवर (स्वयंचलन) भर देण्याबाबत सुतोवाच करण्यात आले होते. यामुळे साधारण प्रत्येक डिलिव्हरीमागे किमान 30 सेंट्सपेक्षा जास्त पैशांची बचत होणार आहे. एवढंच नाही तर ते २०३३ पर्यंत आतापेक्षा जवळपास दुप्पट प्रॉडक्ट्सची विक्री करू शकतात.
न्यूयॉर्क टाईम्सच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार ॲमेझॉनने मानवी कर्मचारी कमी करून रोबोट्सद्वारे काम करून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यात उत्पादनही दुप्पट होईल. यासाठी 2033 पर्यंत कंपनीला जी 6 लाख कामगारांची आवश्यकता होती ती राहणार नाही. म्हणजेच या 6 लाख कामगारांचं काम रोबोट्स करतील. कंपनीच्या वेअरहाऊसमधील (गोदाम) 75 टक्के कामांचं ऑटोमेशन करून कमीत कमी मनुष्यबळ नेमायचे, असे संकेत कंपनीच्या कागदपत्रांवरून मिळत आहेत.
टाईम्सच्या हाती लागलेल्या या कागदपत्रांनुसार कंपनी या नव्या बदलाबाबत जनमानसांमधील धारणेची तीव्रता देखील कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. कंपनी आपण कसं गूड कॉर्पोरेट सिटीझन आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ते स्थानिक कम्युनिटीसोबत संपर्क वाढवत आहे.
याचबरोबर सर्व एक्झिक्युटिव्हजना ऑटोमेशन आणि एआय या शब्दांचा वापर करणं टाळा असा देखील सल्ला देण्यात आला आहे. त्याच्या ऐवजी उद्यावत तंत्रज्ञान (advanced technology) किंवा कोबोट्स (collaborative robots) अशा संज्ञा वापरण्याचा सल्ला कंपनीकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, न्यू यॉर्क टाईम्सच्या या वृत्तानंतर अमेझॉनचे प्रवक्ते केली नांतेल यांनी जी कागदपत्र लीक झाली आहेत. ती कागदपत्र अपूर्ण आहेत. आणि लोकांना हायर करण्याबाबतच्या मोठ्या स्ट्रॅटेजीबाबत त्यामध्ये काही नाही. टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अमेझॉन हे येणाऱ्या हॉलिडे हंगामात जवळपास अडीच लाख लोकांना जॉब देण्याचा प्लॅन करत आहे. मात्र कंपनीकडून नव्या नोकऱ्यांमधील किती नोकऱ्या या कायमस्वरूपी असतील याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीकडून आपल्या अधिकाऱ्यांना विशिष्ट संज्ञाच वापरा असा कोणताही सल्ला दिला गेला नसल्याचं सांगण्यात आलं आहे.