

AI minister Diella pregnant
नवी दिल्ली: अल्बानिया हा जगातील असा पहिला देश आहे, ज्याने अधिकृतपणे आपल्या मंत्रिमंडळात एका 'नॉन-ह्यूमन' मंत्र्याचा समावेश केला आहे. ही मंत्री पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून बनवली आहे आणि तिचे नाव डिएला ठेवले आहे. डिएला यांच्या नियुक्तीमुळे आधीच खूप चर्चा झाली होती, पण आता एआयने बनलेली ही मंत्री 'गर्भवती' झाली आहे.
एआय डिएला ८३ मुलांना जन्म देणार आहे, असे बोलले जात आहे. अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. एआयने बनलेली मंत्री गर्भवती कशी झाली आणि ती एकाच वेळी ८३ बाळांना जन्म कशी देऊ शकते हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल.
डिएला ही अल्बानियाच्या मंत्रिमंडळातील जगातील पहिली 'नॉन-ह्यूमन' AI मंत्री आहे. अल्बानियाच्या सार्वजनिक खरेदी प्रणालीला १००% पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त बनवण्यासाठी डिएलाची नियुक्ती सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती. ही AI मंत्री पारंपरिक अल्बानियाई वेशभूषेत एका महिलेच्या रूपात दर्शविली जाते. ती पूर्णपणे कोड आणि पिक्सेलने बनलेली एक आभासी संस्था आहे. सार्वजनिक निविदा प्रक्रियेशी संबंधित सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली आहे.
आता अल्बानियाचे सरकार प्रत्येक खासदारासाठी एआय असिस्टंट बनवण्याचा विचार करत आहे. यालाच त्यांनी डिएला गर्भवती असणे आणि ८३ मुलांना जन्म देणे, याच्याशी जोडून सांगितले आहे. बर्लिनमधील ग्लोबल डायलॉग (बीजीडी) मध्ये अल्बानियाचे पंतप्रधान म्हणाले, 'आम्ही डिएलासोबत एक मोठा धोका पत्करला आणि त्यात यशस्वी झालो. डिएला गर्भवती आहे आणि तिच्या पोटात ८३ मुले आहेत.'
त्यांच्या मते, "ही मुले म्हणजेच असिस्टंट्स संसदेतील प्रत्येक कार्यक्रम रेकॉर्ड करतील आणि खासदारांना चुकलेल्या कार्यक्रमांची आणि चर्चेची माहिती देतील. प्रत्येक मूल खासदारांचे सहाय्यक म्हणून काम करेल. ते खासदारांना सूचना देखील देतील. त्यांना त्यांच्या 'आई' म्हणजेच डिएलाबद्दलही माहिती असेल."
अल्बेनिया २०२६ पर्यंत ही प्रणाली पूर्णपणे अंमलात आणण्याच्या दिशेने काम करत आहे. अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा म्हणाले, 'जर तुम्ही कॉफी प्यायला गेलात आणि कामावर यायला विसरलात, तर ही मुलं सभागृहात त्यावेळेस काय बोलले गेले, हेच सांगतील. खासदारांनी कशावर 'काउंटर अटॅक' करायचा हे ते सांगतील. जेव्हा मी पुढच्या वेळी येईन, तेव्हा डिएलाच्या मुलांसाठी ८३ स्क्रीनही असतील.'