

Air India Emergency Landing
थायलंडमधील फुकेतहून भारतातील नवी दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात शुक्रवारी बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर फुकेत बेटावरील विमानतळावर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
थायलंड विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एआय ३७९ या विमानातील सर्व १५६ प्रवासी सुखरूप आहेत.
फ्लाइट ट्रॅकर फ्लाइटराडार२४ नुसार, एअर इंडियाच्या विमानाने शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता फुकेत विमानतळावरून उड्डाण घेतले होते. ते दिल्लीच्या दिशेने चालले होते. पण अंदमान समुद्राभोवती एक मोठे वळण घेत विमान थायलंडच्या दक्षिणेकडील फुकेत बेटावरील विमानतळावर उतरले.
अहमदाबादजवळ गुरुवारी एअर इंडियाचे विमान कोसळून २६१ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत खबरदारीचा उपाय म्हणून थायलंड येथून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
गेल्या वर्षी भारतीय विमान कंपन्या आणि विमानतळांना अनेक बॉम्बच्या मिळाल्या आहेत. पहिल्या १० महिन्यांत जवळपास १ हजार बोगस कॉल आणि मेसेजिस आल्याची नोंद आहे. हे प्रमाण २०२३ च्या तुलनेत जवळपास १० पटीने अधिक होते.