

Afghanistan viral video
काबूल : तालिबानशासित अफगाणिस्तानमधील सार्वजनिक फाशीचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. आपल्या कुटुंबातील १३ सदस्यांची (९ मुलांसह) हत्या करणाऱ्या एका दोषी व्यक्तीला भर स्टेडियममध्ये ८० हजार लोकांच्या साक्षीने फाशी देण्यात आली. विशेष म्हणजे, ही फाशीची शिक्षा एका १३ वर्षांच्या मुलाच्या हस्ते देण्यात आली, ज्याच्या कुटुंबाची हत्या झाली होती.
पूर्व अफगाणिस्तानमधील खोस्ट येथील एका क्रीडा स्टेडियममध्ये मंगळवारी ही सार्वजनिक फाशी देण्यात आली. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी फाशी दिलेल्या व्यक्तीचे नाव मंगल असे सांगितले आहे. मंगलने सुमारे १० महिन्यांपूर्वी अब्दुल रहमान आणि त्याच्या कुटुंबातील १३ सदस्यांची (नऊ मुलांसह) हत्या केली होती. अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगलला दोषी ठरवले होते आणि तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्लाह अखुंदजादा याने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते.
खोस्ट येथे हजारो लोकांच्या जमावामध्ये ही फाशी दिली गेली. पीडित कुटुंबाला माफी देण्याचा पर्याय देण्यात आला होता, पण त्यांनी मृत्यूदंड देण्यास सांगितले. मंगलला माफ करणार का, असे विचारल्यावर १३ वर्षांच्या मुलाने नकार दिला आणि नंतर त्यानेच गोळी झाडून फाशीची दिली.
तालिबानने सत्ता मिळाल्यानंतर शरीया कायद्याचे कठोरपणे पालन सुरू केले आहे, ज्यात सार्वजनिक फाशीचा समावेश आहे. या क्रूर अंमलबजावणीवर जगभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अफगाणिस्तानसाठी संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी रिचर्ड बेनेट यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करून याला "अमानवी, क्रूर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध" म्हटले आहे.
तालिबानने २०२१ मध्ये सत्ता परत मिळवल्यापासून केलेली ही ११ वी न्यायिक हत्या आहे. तालिबानचे प्रवक्ते मोस्तगफार गुरबाज यांनी या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, "इस्लामिक व्यवस्थेचा हाच अर्थ आहे, एक अशी व्यवस्था जी कोणालाही घाबरत नाही आणि अल्लाहच्या आज्ञा लागू करते." दुसरीकडे, मानवाधिकार संघटनांनी तालिबानच्या न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेच्या आणि योग्य प्रक्रियेच्या अभावावर पुन्हा एकदा टीका केली आहे.