पुढारी ऑनलाईन डेस्क
घटनेचे उल्लंघन केल्याप्रकरणी थायलंडच्या न्यायालयाने (Thai court) पंतप्रधान श्रेथा थाविसिन (Thailand Prime Minister Srettha Thavisin) यांना पदावरुन बडतर्फ केले आहे. कधीकाळी तुरुंगवास भोगलेल्या एका माजी वकिलाची मंत्रिमंडळात नियुक्ती केल्याबद्दल थायलंडच्या न्यायालयाने थेट पंतप्रधानांवर पदावरून बडतर्फ केले आहे. श्रेथा यांचे वर्तन घटनेचे उल्लंघन करणारे असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे.
तुरुंगवास भोगलेल्या एकाची मंत्रीपदी नियुक्ती करून राजकीय उलथापालथ घडवून आणणे. तसेच सत्ताधारी युतीमध्ये बदल घडवून आणून नैतिकतेचे उल्लंघन केल्याचा ठपका न्यायालयाने पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांच्यावर ठेवला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळख असलेले श्रेथा हे याच न्यायालयाच्या निर्णयानंतर पदावरुन हटवण्यात आलेले १६ वर्षातील चौथे थायलंडचे पंतप्रधान आहेत. ते त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांना बडतर्फ करण्याच्या बाजूने न्यायालयाने ५-४ असा निकाल दिला आहे.
श्रेथा यांना एका वर्षाहून कमी कालावधीतच पदावरुन हटवण्यात आल्याने आता नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी संसदेची बैठक बोलवावी लागणार आहे. थायलंडमध्ये दोन दशके सत्तापालट आणि न्यायालयाच्या निर्णयांमुळे अनेक सरकारे आणि राजकीय पक्षांना धक्के बसले आहेत. यामुळे येथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.
श्रेथा यांना ज्या न्यायालयाने बडतर्फ केले आहे; त्याच न्यायालयाने देशातील मुव्ह फॉरवर्ड पार्टी विसर्जित करण्याचा निर्णय दिला होता. तसेच त्यांच्या नेत्यांना १० वर्षांसाठी राजकारणापासून बंदी घातली होती. या घडामोडीच्या एका आठवड्यानंतर आता पंतप्रधानांना बडतर्फ करण्याचा निकाल सदर न्यायालयाने दिला आहे. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत मुव्ह फॉरवर्ड पार्टी सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या.
"मी न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो. मी पंतप्रधानपदी जवळपास एक वर्ष आहे. मी प्रामाणिकपणे देशाचे नेतृत्व करण्याचा चांगल्या हेतूने प्रयत्न केला आहे," अशी प्रतिक्रिया श्रेथा थाविसिन यांनी घटनात्मक न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना दिली.