

Texas Murder case
अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिनमध्ये एका धक्कादायक घटना घडली. येथील कॅपमेट्रो बसमध्ये एका भारतीय व्यक्तीने दुसऱ्या एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला चाकूने हल्ला करून भोसकले. त्यात त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव अक्षय गुप्ता (Akshay Gupta) असे असून त्याचे वय ३० वर्षे आहे. त्याचा हल्लेखोराशी पूर्वी कसलाही संपर्क आला नव्हता. या प्रकरणी हल्लेखोर दीपक कंडेल (३१) (Deepak Kandel) याला घटनास्थळी अटक करण्यात आली. त्याच्यावर फर्स्ट डिग्री हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
ही घटना १४ मे २०२५ रोजी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास घडली. ऑस्टिन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण ऑस्टिनमध्ये बस प्रवासादरम्यान अक्षय गुप्ता याच्या मानेवर अचानक चाकूने वार करण्यात आले. हल्लेखोर आरोप कंडेल बसमध्ये गुप्ता यांच्या जवळ बसला होता, तेव्हा त्याने गुप्तावर चाकुने हल्ला केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. "दोघांमध्ये कोणताही वाद नसताना कांडेल याने गुप्ता याच्या मानेवर चाकूने वार केले," असे पोलिसांकडून सांगण्यात आले. केएक्सएएन नेटवर्कच्या वृत्तानुसार, आपत्कालीन मदत पथकाने गुप्ता याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण रात्री ७:३० वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले.
कंडेल याला राहण्यासाठी घर नसल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या हल्ल्यामागील नेमके कारण पोलिसांकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
ऑस्टिन पोलिसांनी बसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी दीपक कंडेल याची ओळख पटवली. बस तातडीने थांबवल्यानंतर कंडेल इतर प्रवाशांसोबत शांतपणे बसमधून उतरला, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. ऑस्टिन पोलिसांनी त्याचा माग काढत लगेच त्याला ताब्यात घेतले.
"बसने ज्या ठिकाणी थांबा घेतला तिथून एक मैलपेक्षा कमी अंतरावर कंडेल पोलिसांच्या हाती लागला," असे सांगण्यात आले. त्याने पोलिसांना सांगितले की, अक्षय गुप्ता हा त्याच्या काकासारखा दिसत होता. म्हणून त्याने त्याच्यावर चाकूने वार करुन संपवले.
गुप्ता कुटुंबीयांनी आणि त्याच्या मित्रांनी अक्षयच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तो एक बुद्धिमान आणि मेहनती व्यक्ती होता. तो टेक उद्योगात नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत आला होता, असे त्याच्या जवळच्या लोकांनी सांगितले.