पुढारी ऑनलाईन डेस्क : इलेक्ट्रिक वाहन आणि ऊर्जा क्षेत्रात अमूल्य याेगदान देणारे उद्योगपती इलॉन मस्क यांच्या कार्याचे जगभर जगभरातून कौतुक होत आहे. मात्र त्यांची कंपनी 'टेस्ला'मध्ये लैंगिक छळ हाेत असल्याचा आरोप काही महिला कर्मचार्यांनी केला आहे. मंगळवारी, 14 डिसेंबर रोजी 'टेस्ला'च्या ६ महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. टेस्लाच्या कॅलिफोर्नियातील प्लांट आणि इतर प्लांट मध्ये लैंगिक शोषण वाढत असल्याचे या महिला कर्मचार्यांचे म्हणणे आहे. अयोग्यरित्या स्पर्श करणे, लैंगिक टिप्पणी करणे आणि तक्रारीचा बदला घेणे, असे प्रकार कंपनीत वाढल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
तक्रार दाखल केलेल्या 6 महिलांपैकी 5 टेस्लाच्या फ्रेमोंट कारखान्यातील कर्मचारी होत्या. दक्षिण कॅलिफोर्नियातील कंपनीच्या सेवा केंद्रात एक महिला कर्मचारी आहे. या सर्वांनी कॅलिफोर्नियाच्या न्यायालयात स्वतंत्र खटले दाखल केले आहेत. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ इलॉन मस्कही या आरोपांपासून सुटू शकले नाहीत. एलॉन मस्क यांचे ट्विट सेक्स आणि ड्रग्जपासून प्रेरित असल्याचा दावा एका महिला कर्मचाऱ्याने केला आहे.
मिशेल कुरन हिने आरोप केला आहे की, टेस्लाच्या फ्रेमोंट कारखान्यात काम केल्यानंतर काही आठवड्यांनंतर तिचे सुपरवाईझर आणि सहकारी तिच्या चेहऱ्यावरुन आणि शरीरावर अश्लील कमेंट करू लागले. मिशेलच्या म्हणण्यानुसार, एकदा तिच्या एका सहकर्मचाऱ्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्या सहकाऱ्याने सांगितले की, येथील कारखान्याच्या पार्किंगमध्ये अनेकदा सहकारी शारीरिक संबंध बनवतात. मिशेलने सांगितले की, अशा अनुभवांमुळे तिला दोन महिन्यांनी नोकरी सोडावी लागली.
तक्रार करणारी आणखी एक महिला कर्मचारी ॲलिसा ब्लिकमन हिने सांगितले की, तिने विनयभंगाची तक्रार केल्यावर तिचा छळ करण्यात आला. त्यांना सुविधा आणि फायदे नाकारण्यात आले. एलिसा म्हणते की, हे असे विशेषाधिकार होते जे या घटनांवर मौन बाळगणाऱ्या महिलांना मिळतात.
टेस्ला कंपनी सार्वजनिकपणे दावा करते की, ती आपल्या कर्मचार्यांसाठी सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरणास प्रोत्साहन देते; पण सत्य हे आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये टेस्लाने आपल्या फ्रेमोंट कारखान्यात काम करणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचाराच्या भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे," असेही तिने म्हटलं आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्रेमोंट प्लांटमध्ये सुमारे 10,000 लोक काम करतात. लैंगिक छळाच्या घटना येथे बऱ्याच काळापासून घडत आहेत. असे नोंदवले गेले आहे की, अनेक तक्रारी कोर्टात पोहोचत नाहीत कारण टेस्ला पूर्ण-वेळ कर्मचारी करारावर स्वाक्षरी करतात ज्यामध्ये कंपनीमधील कामाच्या ठिकाणावरील विवादांचे निराकरण करण्यासाठी कलमे आहेत. या गंभीर आरोपांवर टेस्ला कंपनीकडून कोणतेही अधिकृत उत्तर आलेले नाही.
हेही वाचलंत का?