WhatsApp : व्हॉट्सॲपची मोठी कारवाई! भारतात ७० लाख खात्यांवर बंदी

WhatsApp : व्हॉट्सॲपची मोठी कारवाई! भारतात ७० लाख खात्यांवर बंदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सॲपने भारतात मोठी कारवाई केली आहे. एप्रिल २०२४ ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान व्हॉट्सॲपने सुमारे ७१ लाख भारतातील खात्यांवर बंदी घातली आहे. भारत मासिक अहवालात मेटा-मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने ही माहीती दिली आहे. गैरवापर टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी व्हॉट्सॲपने ही कारवाई केल्याचे अहवालात म्हटले आहे. वापरकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन केले तर आणखी खाती बंद करण्याचा इशारा देखील कंपनीने दिला आहे.

७१ लाखांहून अधिक खात्यांवर बंदी

व्हॉट्सॲप दर महिन्याला गोपनीयतेचे उल्लंघन करणाऱ्या लाखो भारतीय युजर्सची खाती बंद करते. एप्रिल महिन्यात व्हॉट्सॲपने एकूण ७१ लाख ८२ हजार खाती बंद केली. यापैकी १३ लाख २ हजार खाती कोणतीही तक्रार येण्यापूर्वीच व्हॉट्सॲपने बंद केली होती. व्हॉट्सॲप अगोदर चुकीच्या गोष्टी रोखण्याचा प्रयत्न करते. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून कोणतीही त्रुटी ओळखता येते. हे तंत्रज्ञान चुकीच्या कामासाठी खाते वापरले जात असेल तर सूचित करणारे सिग्नल देते.

तक्रारीवरून ६ खात्यांवर कारवाई

एप्रिल २०२४ मध्ये व्हॉट्सॲपवर वापरकर्त्यांकडून एकूण १० हजार ५५४ तक्रारी आल्या होत्या. या तक्रारी अनेक प्रकारच्या होत्या, ज्यात खात्याशी संबंधित समस्या, बंदीनंतर अपील, ॲपशी संबंधित समस्या आणि सुरक्षेबाबतच्या समस्यांचा समावेश होता. परंतु, या तक्रारींच्या आधारे केवळ ६ खात्यांवर कारवाई करण्यात आली.

व्हॉट्सॲपने बंद केलेली भारतीय खाती २०२१ मध्ये केलेल्या माहिती तंत्रज्ञान नियमांचे पालन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहेत. हे नियम कंपन्यांना वापरकर्त्याच्या तक्रारी मिळाल्यावर आणि कायदे मोडले गेल्यावर त्यांनी कोणती कारवाई केली हे तपशीलवार अहवाल प्रकाशित करण्यास सांगते. व्हॉट्सॲपच्या जून २०२४ च्या ताज्या अहवालात असे दिसून आले आहे की, ते वापरकर्त्याच्या तक्रारी आणि स्वतःच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने चुकीच्या गोष्टी थांबवण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news