कोण आहेत निकेश अरोरा? जे बनले जगातील दुसरे सर्वाधिक पगार घेणारे CEO | पुढारी

कोण आहेत निकेश अरोरा? जे बनले जगातील दुसरे सर्वाधिक पगार घेणारे CEO

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वंशाचे निकेश अरोरा (Nikesh Arora) हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त पगार असणारे सीईओ (CEO) बनले आहेत. निकेश अरोरा हे पालो अल्टो नेटवर्कचे (Palo Alto Networks) सीईओ आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलने नुकतीच २०२३ मधील अमेरिकेतील सर्वाधिक पगार असलेल्या सीईओंची यादी जाहीर केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, मूळ भारतीय वंशाचे निकेश अरोरा यांनी अंदाजे १,२६० कोटी (१५१.४३ दशलक्ष डॉलर) भरघोस कमाईसह या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. या यादीत १६२ दशलक्ष डॉलर्सच्या कमाईसह ब्रॉडकॉमचे हॉक टॅन अव्वल ठरले आहेत.

झुकेरबर्ग, सुंदर पिचाई यांच्यापेक्षा जास्त पगार

पालो अल्टो नेटवर्कचे सीईओ निकेश अरोरा यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (२०३ कोटी) आणि गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई (सुमारे ७३ कोटी) यांसारख्या टेक क्षेत्रातील दिग्गजांना मागे टाकत या यादीत वरचे स्थान मिळवले आहे.

शंतनू नारायण ११ व्या क्रमांकावर

भारतीय वंशाच्या १७ जणांनी टॉप ५०० मध्ये स्थान मिळवले आहे. यात Adobe चे शंतनू नारायण ४४.९३ दशलक्ष डॉलरसह ११ व्या क्रमांकावर आहेत. संजय मल्होत्रा ​​(मायक्रॉन टेक्नॉलॉजी), अजेई गोपाल (ॲन्सिस), आणि रेश्मा केवलरामानी (व्हर्टेक्स फार्मास्युटिकल्स) टॉप १२० मध्ये आहेत.

कोण आहेत निकेश अरोरा?

  1. निकेश अरोरा यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६८ रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे झाला. त्यांचे वडील भारतीय हवाई दलात कार्यरत होते. निकेश अरोरा हे दिल्लीच्या एअर फोर्स पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. १९८९ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BHU) वाराणसी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करण्यापूर्वी त्यांनी एअर फोर्स स्कूल (सुब्रतो पार्क) येथे शिक्षण घेतले. विप्रोमध्ये काही काळ काम केल्यानंतर ते मॅसॅच्युसेट्समधील बोस्टन नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये एमबीए शिक्षणासाठी अमेरिकेला गेले.
  2. १९९२ मध्ये त्यांनी फिडेलिटी इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांचा कामाचा प्रवास सुरू केला. तिथे त्यांनी वित्त आणि तंत्रज्ञान व्यवस्थापन म्हणून जबाबदारी सांभाळली. ते फिडेलिटी टेक्नॉलॉजीजचे उपाध्यक्ष झाले. २००० मध्ये त्यांनी Doutsche Telekom ची T-Motion ही उपकंपनी स्थापन केली, जी नंतर T-Mobile च्या मुख्य सेवांचा भाग बनली. त्यांनी Deutsche टेलिकॉम AG च्या T-Mobile आंतरराष्ट्रीय विभागाचे मुख्य मार्केटिंग अधिकारी म्हणूनही काम केले.
  3. त्यांनी Google चे मुख्य व्यवसाय अधिकारीदेखील काम केले. २०१२ मध्ये जेव्हा कंपनीने त्यांना ५१ दशलक्ष डॉलर पॅकेजसह नियुक्त केले होते तेव्हा अरोरा हे Google मधील सर्वात जास्त पगार घेणारे अधिकारी बनले होते. त्यानी २०१४ मध्ये Google सोडले.
  4. त्यानंतर अरोरा यांनी २०१४ मध्ये जपानच्या सॉफ्टबँक कॉर्पसाठी काम केले. ते सॉफ्टबँक इंटरनेट आणि मीडिया इंकचे समूहाचे उपाध्यक्ष आणि सीईओ बनले. त्यांनी जून २०१६ मध्ये सॉफ्टबँकमधील त्यांचा पदाचा राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांनी सॉफ्टबँकचे प्रमुख पद भरपाई घेत सोडले होते, जे जपानसाठी एक विक्रमी पॅकेज मानले जाते. २०१८ पासून ते Palo Alto Networks या सायबर सुरक्षा फर्ममध्ये कार्यरत आहेत.

हे ही वाचा :

 

Back to top button