पाकिस्‍तानमध्‍ये X प्लॅटफॉर्मवर बंदी, दिले राष्ट्रीय सुरक्षेचे कारण | पुढारी

पाकिस्‍तानमध्‍ये X प्लॅटफॉर्मवर बंदी, दिले राष्ट्रीय सुरक्षेचे कारण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍ताने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitte) वर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्‍याचा आदेश दिला आहे. गृह मंत्रालयाने आज (दि.१७) इस्लामाबाद उच्च न्यायालयाला सांगितले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X त्याच्या गैरवापराबद्दल चिंता दूर करण्यात अयशस्वी ठरला आहे. त्‍यामुळे त्‍यावर बंदी घालणे आवश्यक आहे. पत्रकार एहतिशाम अब्बासी यांनी बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीवेळी गृह मंत्रालयाने आपला अहवाल सादर केल्‍याचे वृत्त ‘द डॉन’ने दिले आहे. या प्रकरणी आता २ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ( Pakistan blocks X )

निवडणूक काळापासूनच सेवा खंडित

सार्वत्रिक निवडणुकीत हेराफेरी करण्‍यात आल्‍याचा आरोप रावळपिंडीचे माजी आयुक्त लियाकत चठ्ठा यांनी ८ फेब्रुवारी २०२४ रोजी केला होता. यानंतर 17 फेब्रुवारीपासून पाकिस्‍तानमध्‍ये X ची सेवा खंडित करण्‍यात आली होती. याचा अधिकार संस्था आणि पत्रकार संघटनांनी निषेध केला होता, अमेरिकेनेही पाकिस्तानला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील निर्बंध उठवण्याचे आवाहन केले होते. 20 मार्च रोजी गृह मंत्रालयाने सिंध उच्च न्यायालयाला (SHC) माहिती दिली होती की, गुप्तचर संस्थांच्या अहवालावर पुढील आदेश येईपर्यंत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेब्रुवारीमध्ये ब्लॉक करण्यात आला आहे.
( Pakistan blocks X )

पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने आज ( दि.१७) इस्लामाबाद उच्‍च न्‍यायालयात सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव फेब्रुवारीमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X तात्पुरते बंदीचे घालण्‍याचे आदेश दिले होते. दरम्‍यान, वापरकर्त्यांनी फेब्रुवारीच्या मध्यापासून पाकिस्तानमध्ये X  वापरताना समस्या नोंदवल्या हाेत्‍या.  परंतु सरकारने बंदीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्‍हती. अखेर गृह मंत्रालयाने आज न्यायालयात  X वरील बंदीचा उल्‍लेख केला.

सरकारने उच्‍च न्‍यायालयात स्‍पष्‍ट केले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitte) हा पाकिस्तान सरकारच्या कायदेशीर निर्देशांचे पालन करण्याबरोबरच त्याच्या प्लॅटफॉर्मच्या गैरवापराबद्दलच्या चिंतांचे निराकरण करण्यात अयशस्वी ठरला आहे. त्‍यामुळे बंदी लादणे आवश्यक आहे,” आजच्‍या सुनावणीवेळी  सरकारच्‍या वतीने अतिरिक्त ॲटर्नी जनरल (एएजी) मुनावर इक्बाल दुग्गल उपस्थित होते. त्‍यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणी गृह मंत्रालयाने अहवाल दाखल केला आहे.

या प्रकरणी आता २ मे रोजी सुनावणी होईल असे इस्लामाबाद उच्च न्यायालयाला न्‍यायमूर्ती फारुक यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button