ISRO Chandrayaan-3 News: ‘विक्रम’ने लँडिंग केलेल्‍या ठिकाणाला ‘शिव शक्ती’ नाव देण्‍यास IAU ची मान्यता | पुढारी

ISRO Chandrayaan-3 News: 'विक्रम'ने लँडिंग केलेल्‍या ठिकाणाला 'शिव शक्ती' नाव देण्‍यास IAU ची मान्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताची चंद्रमोहिम चांद्रयान-३ लॅडिंगला सात महिने पूर्ण झाल्यानंतर या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-३ चे विक्रम लँडर चंद्रावर ज्याठिकाणी उतरले त्या बिंदूला ‘शिव शक्ती’ असे नाव देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. दरम्यान या घोषणेला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने (IAU) अधिकृतरित्या मान्यता दिली आहे. यासोबतच चांद्रयान-3 चा लँडिंग दिवस २३ ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचेही PM मोदी म्हणाले होते.  त्‍यांच्‍या या घोषणेला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाकडून मान्यता मिळाल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. (ISRO Chandrayaan-3 News)

खगोलशास्त्रीय संस्थेने मंजूर केलेल्या ग्रहांच्या नावांची तपशीलवार माहिती देणाऱ्या प्लॅनेटरी नामांकनाच्या गॅझेटियरनुसार, चांद्रयान-3 लँडिंग साइटसाठी “स्टेटिओ शिवशक्ती” हे नाव पॅरिसस्थित IAU ने 19 मार्च रोजी मंजूर केले. चंद्रयान-3 च्या विक्रम लँडरचे लँडिंग साइट नावाच्या उत्पत्तीबद्दल, गॅझेटियरने म्हटले आहे की, “भारतीय पौराणिक कथांमधील ‘शिव’  आणि ‘शक्ती’  हे संयुग शब्द भारतीय देवांची नावे दर्शवतात. (ISRO Chandrayaan-3 News )

ISRO Chandrayaan-3 News:चंद्राच्या द. ध्रुवावर पोहचणारा भारत पहिला

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून अवकाश तंत्रज्ञानात इतिहास रचला. चांद्रयान-३ च्या यशानंतर भारत  आता चंद्राच्या अनपेक्षित दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा पहिला देश ठरला आहे. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या पहिल्या चार राष्ट्रांमध्ये देखील भारताचा समावेश आहे. (ISRO Chandrayaan-3 News)

चंद्रावरील चांद्रयान-2 मोहीमांच्या ठशांना ‘तिरंगा’ नाव : PM नरेंद्र मोदी

चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, चंद्राच्या पृष्ठभागावरील ज्या जागेवर चांद्रयान-2 ने आपल्या पावलांचे ठसे सोडले त्यालादेखील ‘तिरंगा’ या नावाने ओळखले जाईल. भारतीय अवकाश तंत्रज्ञातील मोहिमांच्या या पाऊलखुणा भारताने केलेल्या प्रत्येक प्रयत्नांची प्रेरणा म्हणून आम्हाला आठवण करून देईल की, “कोणतेही अपयश अंतिम नसते”, असेही पीएम मोदी म्हणाले होते.

हेही वाचा:

 

Back to top button