Indonesian boat tragedy | मोठी दुर्घटना! इंडोनेशियाच्या किनारपट्टीवर रोहिंग्या निर्वासितांची बोट उलटली, ५० जणांचा मृत्यूची भीती | पुढारी

Indonesian boat tragedy | मोठी दुर्घटना! इंडोनेशियाच्या किनारपट्टीवर रोहिंग्या निर्वासितांची बोट उलटली, ५० जणांचा मृत्यूची भीती

पुढारी ऑनलाईन : इंडोनेशियाच्या आचे प्रांताच्या किनारपट्टीवर लाकडी बोट उलटल्याने सुमारे ५० रोहिंग्या निर्वासितांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या बोटीतून सुमारे १५० लोक प्रवास करत होते. मच्छिमारांनी किमान सहा जणांना वाचवले आहे. या बोटीचा शोध घेतला जात आहे. (Indonesian boat tragedy)

बुधवारी सकाळी खवळलेल्या समुद्रात बोट उलटली. ही घटना आचेच्या पश्चिम किनाऱ्यावरील कुआला बुबोनच्या समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे १९ किमी (१२ मैल) अंतरावर घडली. यातील चार महिला आणि दोन पुरुषांना आचे येथील मच्छिमारांनी वाचवले. त्यांना निवारागृहात नेण्यात आले.

Al Jazeera च्या वृत्तानुसार, बोट उलटल्यानंतर अनेकजण बुडाल्याची माहिती या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांनी दिली आहे. “नेमक्या किती लोकांचा मृत्यू झाला आहे याची पुष्टी झालेली नाही. पण ज्या सहा जणांना वाचवण्यात आले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकजणांचा मृत्यू झाला आहे,” असे UN निर्वासित एजन्सी (UNHCR) चे प्रतिनिधी फैसल रहमान यांनी सांगितले. “बोट उलटली तेव्हा सुमारे ५० लोक मरण पावल्याची भीती आहे.”

ज्यांना पोहता येत नव्हते अशा स्त्रिया आणि लहान मुले मरण पावली आहेत आणि प्रवाहाने ते समुद्रात ओढले गेले.

सोशल मीडियावर या दुर्घटनेचे काही व्हिडिओ फुटेज शेअर करण्यात आले आहेत. जे घटनास्थळी स्थानिक मच्छिमारांनी शूट केलेले आहेत. या फुटेजनुसार, वाचलेले लोक उलटलेल्या बोटीवर उभे असल्याचे दिसतात. (Indonesian boat tragedy)

आचे बारात जिल्ह्यातील मच्छिमारी समुदायाचे नेते अमीरुद्दीन यांनी सांगितले की, बुधवारी इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेकडून शोध आणि बचाव नौका पाठवण्यात आली होती.

ऑगस्ट २०२३ मध्ये बंगालच्या उपसागरात बोट बुडाल्याने १७ रोहिंग्या निर्वासितांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा :

Back to top button