पुढारी ऑनलाईन डेस्क : तालिबानने अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना (Pakistan Airstrikes) चोख प्रत्युत्तर दिले आहे. तालिबानी सैन्याने ड्युरंड सीमेवरील पाकिस्तानी लष्करी चौक्या उद्ध्वस्त केल्या. अफगाण मीडियाने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. (Taliban Attack)
संबंधित बातम्या :
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तालिबानच्या सीमेवरील सैन्याने पाकिस्तानी लष्करी केंद्रांना लक्ष्य केले. अफगाणिस्तानचे संरक्षण दल कोणत्याही लष्करी कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. आम्ही सर्व परिस्थितीत आमच्या अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणार असल्याचे म्हटले आहे. (Taliban Attack)
सोमवारी (दि.१८) ड्युरंड सीमेवर तालिबान आणि पाकिस्तानी सीमा सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यानंतर पाकिस्तानकडून रॉकेट हल्ले (Pakistan Airstrikes) करण्यात आले. यामुळे अफगाणिस्तानातील दांडपाटन भागातील लोकांना घरे सोडावी लागली. यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खोस्त आणि पक्तिका प्रांतात हवाई हल्ले केले. ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानी लढाऊ विमाने पुन्हा एकदा अफगाण हद्दीत घुसली. त्यांनी पक्तिका प्रांतातील बारमेल जिल्हा आणि खोस्त प्रांतातील सेपेरा जिल्ह्यात बॉम्बस्फोट केले. निवासी भागात पाकिस्तानच्या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला.
तालिबानने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. पाकिस्तानचे हवाई हल्ले हे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा तालिबानचे प्रवक्ते जबिउल्ला मुजाहिद यांनी पाकिस्तानला दिला आहे. तालिबानचे उप प्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनीही अफगाणिस्तानचे इस्लामिक अमिरात या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये आंतकवाद विरोधात मोहीम राबवली. हाफिज गुल बहादुर समुहाच्या आतंकवाद्यांना संपविणे हा अभियानाचा उद्देश होता. तहरीक-ए-तालिबानसोबत हाफिज गुल बहादुर समुह पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याला जबाबदार आहे. दोन्ही बंदी घातलेल्या संघटनांमुळे हजारो नागरिक आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
हेही वाचा :